आता पॉस मशीन देईल शेतकऱ्यांना खताची माहिती!
By admin | Published: June 29, 2017 01:32 AM2017-06-29T01:32:54+5:302017-06-29T01:32:54+5:30
माती परीक्षण आवश्यक : मातीतील पोषक घटकांची माहिती मिळणार!
विवेक चांदूरकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : शेतातील मातीत कोणत्या पोषक घटकांची कमतरता आहे, याचा अभ्यास न करता दरवर्षी शेतकरी मोठ्या प्रमाणात खत टाकतात, त्यामुळे बरेचदा त्यांचा अनाठायी खर्च होतो. यावर शासनाने तोडगा काढला असून, यानंतर शेतकऱ्यांना खत खरेदी करताना त्यांच्या शेतात कोणत्या खताची किती आवश्यकता आहे, याची माहिती पॉस मशीनच देणार आहे. आगामी तीन वर्षांमध्ये राज्यातील प्रत्येक कृषी सेवा केंद्रांवर पॉस मशीन बसविण्यात येणार आहेत.
सध्या शासनाच्यावतीने खताची सबसिडी देण्याच्या पद्धतीत बदल करण्यात आला आहे. सध्या कृषी सेवा केंद्रांमध्ये पॉस मशीन लावण्यात येत आहे. या पॉस मशीनमध्ये शेतकऱ्याचे आधार कार्ड व बोटाचे ठसे घेण्यात येणार आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या आधार कार्डासोबतच त्यांच्या शेतातील माती परीक्षणाचा अहवालही जोडण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकरी दुकानात खत खरेदीसाठी गेल्यावर त्याच्या शेतातील मातीमध्ये नत्र, स्फुरद, पालाश यापैकी कोणत्या पोषक घटकांची किती कमतरता आहे, याची माहितीही मिळणार आहे.
सद्यस्थितीमध्ये बहुतेक शेतकऱ्यांकडून माती परीक्षण न करता ठरावीक खत पिकांना देण्यात येते. दरवर्षी एकच खत दिल्यामुळे मातीमध्ये एखाद्या पोषक घटकाचे प्रमाण वाढते, तर एखाद्याचे कमी होते. त्याचा परिणाम मातीच्या आरोग्यावर होतो तसेच उत्पन्नातही घट येते. यानंतर मात्र शेतकऱ्यांच्या त्यांच्या शेतातील घटकांचे प्रमाण कळणार असल्यामुळे शेतात योग्य खत देण्यात येणार आहे. परिणामी, मातीचे आरोग्य चांगले राहील, शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होईल आणि उत्पादनातही वाढ होणार आहे.
शेतकऱ्यांच्या शेतातील मातीचे परीक्षण करून त्यांच्या आधार कार्डशी लिंक करण्याचे काम सुरू झाले असून, आगामी तीन वर्षांत पूर्ण होणार आहे. तीन वर्षांनंतर पूर्ण शेतकऱ्यांना पॉस यंत्राद्वारे मातीतील पोषक घटकांची माहिती मिळणार आहे, तर तोपर्यंत ज्या शेतकऱ्यांचे माती परीक्षण व आधार लिंक झाले आहे, त्यांना आतापासूनच माहिती मिळणार आहे.
पॉस मशीनमध्ये शेतकऱ्यांचे आधार कार्ड व माती परीक्षणाचा अहवाल लिंक करण्यात येणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील मातीत कोणत्या मूलद्रव्यांची कमतरता आहे, याची माहिती मिळणार आहे. त्यानुसार शेतकरी खत खरेदी करतील. त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी होईल व उत्पादनात वाढ होईल.
- विजय मोकाळे, कृषी विकास अधिकारी, बुलडाणा