आश्रमाशाळेत आता विषयनिहाय शिक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 02:57 PM2019-09-09T14:57:03+5:302019-09-09T14:57:12+5:30
आश्रमशाळांसाठी विज्ञान शिक्षकांची अतिरिक्त पदे भरण्यात येणार असल्यामुळे प्रत्येक विषयासाठी पदव्यूत्तर पदवीधारक शिक्षक मिळणार आहे.
- ब्रम्हानंद जाधव
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: आदिवासी विकास विभागांतर्गत १ हजार ५८ शासकीय व अनुदानित आश्रमशाळा चालविण्यात येतात, त्यात २७ शाळा ह्या पश्चिम वºहाडात आहे. या शाळांवर एकाच विषयातील पदव्युत्तर पदवी असताना उच्च माध्यमिकच्या एका शिक्षकाला विज्ञान शाखेचे दोन विषय शिकवावे लागत होते. परंतू आता राज्यातील आदिवासी उच्च माध्यमिक आश्रमशाळांसाठी विज्ञान शिक्षकांची अतिरिक्त पदे भरण्यात येणार असल्यामुळे प्रत्येक विषयासाठी पदव्यूत्तर पदवीधारक शिक्षक मिळणार आहे; याचा पश्चिम वºहाडातील १२ शाळांना फायदा होणार आहे.
राज्यातील आदिवासी विकास विभागांतर्गत ५०२ शासकीय व ५५६ अनुदानित आश्रमशाळा चालविण्यात येतात. या आश्रमशाळांपैकी १२१ शासकीय आश्रमशाळा व १५४ अनुदानित आश्रमशाळांमध्ये उच्च माध्यमिकच्या ११ वी व १२ वी कला व विज्ञान शाखेचे वर्ग चालविण्यात येत आहेत. आश्रमशाळेमध्ये उच्च माध्यमिक स्तरावर विज्ञानशाखेला प्रामुख्याने भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, व गणित असे विषय असून या शाखेसाठी तीन पदे मंजूर आहेत. एकाच विषयातील पदव्युत्तर पदवी असताना उच्च माध्यमिकच्या एका शिक्षकाला विज्ञान शाखेचे दोन विषय शिकवावे लागत होते.
त्यामुळे त्यांच्यावरील कार्यभार अधिक होत असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर त्याचा विपरीत परिणाम होत होता. याचा विचार करून सुधारित आश्रमशाळा संहितेनुसार आकृतिबंधामध्ये सुधारणा करून विज्ञान शाखेसाठी चार शिक्षकांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक विषयासाठी पदव्युत्तर पदवीधारक शिक्षक उपलब्ध होणार आहेत.
आश्रमशाळेत अकरावी व बारावीच्या विज्ञान शाखेत शिकविणाऱ्या २५ हजाराहुन अधिक आदिवासी विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. यापूर्वी आदिवासी विभागांतर्गत असलेल्या आश्रमशाळांपैकी १० शासकीय माध्यमिक आश्रमशाळा आणि ११ अनुदानित माध्यमिक आश्रमशाळांना श्रेणीवाढ देऊन इयत्ता अकरावी व बारावीचे कला व विज्ञान शाखेचे वर्ग चालविण्यास मान्यता देण्यात आली होती. या आश्रमशाळा वगळून उर्वरित सर्व शासकीय व अनुदानित उच्च माध्यमिक आश्रमशाळांसाठी विज्ञान विषयाच्या शिक्षकाचे एक अतिरिक्त पद मंजूर करण्यास आदिवासी विकास विभागाने मान्यता दिली आहे. त्यामुळे आश्रमशाळेतील शिक्षकांवर येणारा कार्यभार हलका होणार आहे.
आदिवासी उच्च माध्यमिक आश्रमशाळांसाठी अतिरिक्त विज्ञान शिक्षक पदास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुषंगाने नुकतेच पत्रही प्राप्त झाले आहेत. अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील १० ते १२ शाळांवर विज्ञान शाखेसाठी अतिरिक्त शिक्षकांची तरतूद आहे.
- आर. बी. हिवाळे,
प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला.