आता लक्षय परतीच्या पावसाकडे; तलाव, धरणे, नदी, नाले कोरडीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 01:35 PM2017-10-08T13:35:25+5:302017-10-08T13:35:42+5:30
साखरखेर्डा : साखरखेर्डा परिसरात गेल्या चार महिन्यात पावसाने ५० टक्केही हजेरी लावली नाही. पावसाळा कधी सुरु झाला आणि केव्हा संपला यातच चार महिने निघून गेली. एकदाही दमदार पाऊस न पडल्याने नदी, नाले खळाखळी नाही. त्यामुळे दुष्काळाचे चित्र स्पष्ट दिसत आहे. परतीच्या पावसाला ५ आॅक्टोंबर पासून सुरुवात झाली. आतातरी दमदार पाऊस पडू दे आणि एकदाची कोरडी पडलेली नदी, नाले, तलाव धरणे यांची पात्र भरु दे अशी प्रार्थना सर्व सामान्य नागरीक करीत आहे. जून महिन्यात पावसाळा सुरु झाला कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत गेला. जमिनीची तहान भागत नाही तोच पाऊस गुल झाला. तब्बल ४५ दिवस पाऊस पडलाच नाही. श्रावण महिन्यात ‘श्रावण मासी हर्ष मनासी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात पाऊस येवूनही क्षणात ऊन पडे’ ही कविता आठवल्या शिवाय राहात नाही. यावर्षी श्रावण महिन्यात एकदाही सरी पडल्या नाहीत. उलट हिरवळी ऐवजी चोहीकडे गवत वाळली होती. ओढे कोरडी पडली. असेच काहीसे चित्र होते. गणपती उत्सवात पाऊस येईल अशी भोळी आशा लावून बसलेल्या शेतकºयांच्या पदरी निराशाच आली. काहीशा सरी मधून मधून पडत गेल्या पिकाला जिवदान मिळाले पण ते नुकसान व्हायचे ते झालेच त्याला कोणीही थांबवू शकत नव्हते. पावसाळा संपला परतीचे दिवस सुरु झाले. या परतीच्या दिवसात एकदातरी दमदार पाऊस पडून नदी, नाले, तलाव, धरणे तुडूंब भरावी ही अपेक्षा आहे. साखरखेर्डा परिसरात महालक्ष्मी, गायखेडी, जागदरी तलावासह अनेक छोटे, मोठे तलाव अनेक आहेत. त्यापैकी महालक्ष्मी आणि गायखेडी तलावात मृत साठ्यापेक्षा कमी पाणी असून दिवाळी नंतर या तलावात पाणी साठा राहिलच याची खात्री नाही. महालक्ष्मी तलावातून साखरखेर्डा गावाला पाणी पुरवठा केला जातो. आज तलावच कोरडा पडला तर दोन वर्षापूर्वीची परिस्थिती निर्माण होवू शकते. गायखेडी तलावामुळे राताळी गावाचा पाणी पुरवठा प्रभावीत होवू शकतो. जागदरी धरणावरुन शेंदुर्जन, राजेगाव, जागदरी, लिंगा, बाळसमुद्र या पाच गावात पाणी पुरवठा होता. गावासाठी पाणी राखीव ठेवले तरच या पाच गावाची तहाणी जागदरी तलाव भागवू शकतो. जर खरीप हंगामात शेतीला पाणी सुरु केले तर ही गावेही पाणी टंचाईच्या कंचाट्यात येवू शकतात. डिसेंबर पासून साखरखेर्डा, राताळी, शिंदी, पिंपळगाव सोनारा, तांदुळवाडी, दरेगांव, बाळसमुद्र, गोरेगाव, उमनगाव, सावंगी, भगत या गावात पाण्याची भिषण टंचाई जाणवू शकते अशी विदारक परिस्थिती आहे. (तालुका प्रतिनिधी)