आता बाजार समिती, सोसायट्यांच्या निवडणुकीचे वेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 11:30 AM2021-01-21T11:30:31+5:302021-01-21T11:30:47+5:30
Election of market committees जिल्ह्यात सेवा सहकारी सोसायटी व कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या व सेवा सहकारी निवडणुकींचे वेध लागले आहेत.
- विवेक चांदूरकर
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम संपत नाही तोच जिल्ह्यात सेवा सहकारी सोसायटी व कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या व सेवा सहकारी निवडणुकींचे वेध लागले आहेत.
जिल्ह्यातील बहुतांश कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा कार्यकाळ संपला आहे. मात्र कोरोनाचे संकट आल्यामुळे बाजार समित्यांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील शेगाव वगळता सर्वच बाजार समित्यांची मुदत संपली असून, त्या ठिकाणी प्रशासक काम पाहत आहेत. कोरोनामुळे निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र, आता कोरोनाचा प्रभाव कमी झाला असून, ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या आहेत.
जिल्ह्यात या वर्षात निवडणुकीस पात्र असलेल्या सोसायट्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम यापूर्वीच जाहीर करण्यात आला होता. मात्र मध्येच कोरोनाचे संकट उद्भवल्याने या निवडणुकींना स्थगिती देण्यात आली होती. आता कोरोनाचे संकट हळूहळू दूर होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर गावागावात असलेल्या सेवा सहकारी, आदिवासी, विविध कार्यकारी व अन्य विविध सोसायट्याच्या कोरोनामुळे स्थगिती देण्यात आलेल्या तसेच निवडणुकीस पात्र असलेल्या सोसायट्यांच्या निवडणुका घेण्याचे सूतोवाच सहकार क्षेत्रातील नेत्यांनी केले आहे.
सहकार क्षेत्रातील नेते कामाला लागले असून, आगामी निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. खामगाव कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहे. गत तीन महिन्यात खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत तीन प्रशासक बदलण्यात आले आहे. ग्रामपंचायत निवडणूक, सहकार क्षेत्रातील निवडणुकांचा प्रभाव जिल्हा परिषदच्या निवडणुकीवर पडतो. त्यामुळे जिल्ह्यातील मातब्बर नेते सहकार क्षेत्रावर आपले वर्चस्व निर्माण करण्याकरिता धडपडत असतात.
जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या व सेवा सहकारी सोसायट्यांची मुदत संपली आहे. त्यामुळे निवडणुका घेण्यात येणार आहे. बाजार समित्या व सोसायट्यांच्या निवडणुका ३१ मार्चनंतर होणार आहे. तोपर्यत प्रशासक काम पाहणार आहे. जिल्ह्यात शेगाव वगळता सर्वच बाजार समित्यांमध्ये प्रशासक काम पाहत आहेत.
- महेंद्र चव्हाण, उपनिबंधक, बुलडाणा.