बुलडाणा जिल्ह्यात अडीच हजार विद्यार्थी देणार 'एनटीएस' परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 03:47 PM2019-10-20T15:47:34+5:302019-10-20T15:47:42+5:30
१३१ शाळांमधील २ हजार २७८ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.
- संजय सोळंके
लोकमत न्यूज नेटवर्क
रायपूर : शालेय जीवनात अत्यंत महत्त्वाचे स्थान असलेली राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा (राज्यस्तरीय ) १७ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. दहावीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेतली जाते. यावर्षी जिल्ह्यातील १३१ शाळांमधील २ हजार २७८ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. शिक्षण विभागाने त्यादृष्टीने तयारी सुरु केली आहे.
आजचे युग हे स्पर्धेचे आहे. स्पर्धा परीक्षांनी दैनंदिन शैक्षणिक जीवन व्यापून टाकले आहे. कुठलीही शासकिय नोकरी मिळविण्यासाठी स्पर्धा परीक्षा अनिवार्य आहे. शिपायापासून तर जिल्हाधिकारी पदाची निवड स्पर्धा परीक्षेतूनच होते. विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळविण्यासाठी स्पर्धा परिक्षांमधूनच जावे लागते. शालेय स्तरावर असणाºया आॅलिंपियाड, गणित संबोध, गणित प्रावीण्य, गणित प्रज्ञा, डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा इ. परीक्षांमुळे बालपणातच विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक दृष्टिकोन रुजविला जातो.
प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना शिष्यवृत्ती देणे हा या परीक्षेचा उद्देश आहे. अकरावी व बारावीसाठी दरमहा १२५० रुपये, सर्व शाखांच्या प्रथम पदवीपर्यंत दरमहा २००० रुपये, सर्व शाखांच्या द्वितीय पदवीपर्यंत (पदव्युत्तर पदवी) दरमहा २००० रुपयेप्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात येते. प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेणारी ही परीक्षा प्रथम १९६२ ते १९८५ पर्यंत बारावी विज्ञान वर्गासाठी घेण्यात येत होती. पुढे १९८६ ते २००७ पर्यंत ही परीक्षा दहावीसाठी घेण्यात येऊ लागली. त्यानंतर २००७ ते २०११ पर्यंत ही परीक्षा आठवीसाठी घेण्यात येत होती. मात्र, २०१२ पासून पुन्हा ही परीक्षा दहावीसाठी घेण्यात येत आहे.
महाराष्ट्रासाठी ही परीक्षा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, यांच्यामार्फत घेण्यात येते. राज्यस्तरीय प्रज्ञा शोध परीक्षा व राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा अशा दोन स्तरावर ही परीक्षा घेतली जाते. राज्यस्तरीय प्रज्ञा शोध परीक्षेचा निकाल सर्वसाधारणपणे मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत घोषित केला जातो. राज्यस्तरीय परीक्षेतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत राष्ट्रीय स्तर परीक्षेचे प्रवेशपत्र पाठविले जाते. ही परीक्षा महत्वाची मानली जाते.
राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो. शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यास दरमहा शिष्यवृत्ती मिळते. यामुळे इतर परीक्षांची तयारी होण्यास काही प्रमाणात मदत होते. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनी आपले प्रवेशपत्र संकतेस्थळावरुन काढून घ्यावे.
- डॉ. श्रीराम पानझाडे
माध्यमिक शिक्षणाधिकारी, बुलडाणा