वीजबळींची संख्या वाढतीच; ‘लोकेशन नेटवर्क’ नावालाच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 11:52 AM2021-07-11T11:52:40+5:302021-07-11T11:53:42+5:30
Khamgaon News : चंद्रपूर, नागपूर, बुलडाणा जिल्ह्यात झालेली जीवितहानी या यंत्रणेच्या उपयुक्ततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरत आहे.
- सदानंद सिरसाट
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : राज्यभरात २५० किमी परिघातील वीज पडण्याची शक्यता टिपणारी लायटनिंग लोकेशन नेटवर्क यंत्रणा आयआयटीएम पुणे या संस्थेने उभारली आहे, तरीही गेल्या पाच वर्षांत वीज पडून मृत्यू आणि वित्तहानी होण्याचे प्रमाण वाढतेच आहे. गेल्या दोन दिवसांत चंद्रपूर, नागपूर, बुलडाणा जिल्ह्यात झालेली जीवितहानी या यंत्रणेच्या उपयुक्ततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरत आहे.
हवामान बदलाच्या काळात वीज पडून मृत्यू होण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत प्रचंड वाढले आहे. त्यामध्ये जीवित आणि वित्तहानीही होत आहे. ते प्रमाण कमी करण्यासाठी वीज पडण्याचे संभाव्य ठिकाणे आधीच हेरून त्याची माहिती त्या परिसरातील लोकांना देणे, हा उपक्रम आयआयटीएम (भारतीय उष्ण कटिबंधीय मोसम विज्ञान संस्था) पुणे या संस्थेने २०१५ पासून सुरू केला. त्यासाठी राज्यातील अनेक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ‘लायटनिंग लोकेशन नेटवर्क’ यंत्रणा उभारली.
अकोला जिल्हाधिकारी कार्यालयातील यंत्रणा दोनशे किमीच्या परिघातील अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम या चार जिल्ह्यांतील परिस्थितीचा अंदाज घेऊ शकते. संभाव्य परिसरात वीज पडण्याच्या अर्धा तास आधी ही माहिती यंत्रणेला प्राप्त होते.