बुलडाणा जिल्ह्यात रोहयोच्या कामांवर मजुरांची संख्या रोडावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 11:42 AM2021-04-18T11:42:15+5:302021-04-18T11:42:23+5:30
Laborers on MNREGA's works decreased : जवळपास ४६ टक्केच मजूर रोजगार हमी योजनेच्या कामांवर हजर असल्याचे चित्र आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कोरोनाचे वाढते संक्रमण पाहता रोजगार हमी योजनेच्या कामांवरही मजुरांची संख्या रोडावल्याचे जिल्ह्यात चित्र आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास ४६ टक्केच मजूर रोजगार हमी योजनेच्या कामांवर हजर असल्याचे चित्र आहे.बुलडाणा जिल्ह्यातील ८६९ ग्रामपंचायतींपैकी ३२० ग्रामपंचायतींमध्ये सध्या रोजगार हमी योजनेची कामे सुरू आहेत. यात प्रामुख्याने घरकूल, वृक्षलागवड, रोपवाटिका आणि शोषखड्ड्यांची कामे सुरू आहेत. या कामावर जिल्ह्यात ४६५२ मजूर कार्यरत आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीत जवळपास ९ हजार तर जून २०२० मध्ये १२ हजार मजूर रोहयोच्या कामावर कार्यरत होते. त्या तुलनेत यावर्षी रोहयोच्या कामावर निम्मे मजूर कामावर असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात कोरोना संसर्गाची व्याप्ती वाढली आहे. ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव झालेला आहे. त्यामुळे रोहयोच्या कामावर मजुरांची संख्या घडली असल्याचा अंदाज रोहयो विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान सध्या ३२० ग्रामपंचायतीमध्ये १०५९ कामे सुरू आहेत. जिल्हयात सध्या ४६५२ मजूर रोहयोच्या कामावर कार्यरत आहे. यामध्ये सर्वाधिक १०२२ मजूर हे संग्रामपूर तालुक्यात कार्यरत असून या तालुक्यात ५० पैकी ३५ ग्रामपंचायतीमध्ये कामे सुरू आहेत. त्यानंतर मेहकर तालुक्यात ३६ ग्रामपंचायतींमध्ये ५७७ मजुरांना काम उपलब्ध करण्यात आले आहे. चिखली तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतीमध्ये ५२२ कामे करण्यात येत आहेत. तुलनेने बुलडाणा तालुक्यात केवळ ९ ग्रामपंचायतींमध्ये ४७ कामे सुरू आहेत. विशेष म्हणजे बुलडाणा तालुक्यात दररोज २०० च्या आसपास कोरोना बाधीत रुग्ण आढळून येत आहेत. त्याचा परिणामही रोहयोच्या कामांवर दिसून येत आहे. रोहयोतंर्गत कामे उपलब्ध असून मजुरांनी ग्रामपंचायतस्तरावर कामाची मागणी करावी, असे आवाहनही रोहयोच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.