पॉझिटिव्हची संख्या अडीचशे पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:31 AM2021-04-19T04:31:43+5:302021-04-19T04:31:43+5:30
शिक्षकांना बदलीसाठी ३० शाळांचा पर्याय बुलडाणा: ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांचे सुधारित धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार जिल्हा ...
शिक्षकांना बदलीसाठी ३० शाळांचा पर्याय
बुलडाणा: ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांचे सुधारित धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार जिल्हा परिषद शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीसाठी आता एकाऐवजी चार जिल्ह्यांचा आता २० ऐवजी ३० शाळांचा पर्याय देता येणार आहे.
बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यक्रम
चिखली: परमानंद सार्वजनिक वाचनालय रानअंत्री येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थाध्यक्ष तात्याराव झाल्टे, रमेश झाल्टे यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. यावेळी पोलीस पाटील राजू खरात, राजू तिवारी, भास्कर खरात, भिकाजी खरात, रवींद्र खरात, श्रीकांत तिवारी, संजू खरात, महेश झाल्टे, रवींद्र झाल्टे, वसंत झाल्टे यांनी अभिवादन केले.
कोरोनामुळे नागरिकांची शेतीकडे धाव
डोणगाव: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी असल्याने व संसर्गाच्या भीतीने नागरिक शेतातच मुक्काम करीत असल्याचे चित्र आहे. शेतातील वातावरण प्रसन्न असते. या ठिकाणी संसर्गाचा धोका नसल्याने नागरिकांनी शेताकडे धाव घेतली आहे.
लोणार बसस्थानकात शुकशुकाट
लोणार : येथे जागतिक दर्जाचे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. यामुळे पर्यटक येथे मोठ्या संख्येने दाखल होत असतात. मात्र सध्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असल्याने बसस्थानकात पूर्णपणे शुकशुकाट पसरला असल्याचे दिसून येत आहे.
मेहकर पोलिसांचा पहारा
मेहकर: संचारबंदीच्या आदेशाचे नागरिकांकडून उल्लंघन होऊ नये, यासाठी शहरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. चौकाचौकात पोलीस तैनात असल्याचे चित्र आहे. अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
पाण्याच्या एटीएमवर कॉईनचा तुटवडा
बुलडाणा : येथील पाण्याच्या एटीएमवर कॉईनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. संचारबंदीमुळे आरओ कॅन घरपोच देणे बंद केले आहे. त्यामुळे नागरिकांना वॉटर एटीएमचा आधार घ्यावा लागतो.
ग्रामपंचायतीतर्फे धूर फवारणी
देऊळगाव राजा: तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. तालुक्यात ग्रामपंचायतीतर्फे गावागावात निर्जंतुकीकरणाच्या दृष्टीने सोडियम हायपोक्लोराइड व धूर फवारणी करण्यात येत आहे. संचारबंदीचे काटेकोर पालन व्हावे, म्हणून पोलिसांनी सुद्धा नागरिकांना चांगलीच शिस्त लावली आहे. नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे.
जनधन याेजनेतील निधीची प्रतीक्षा
सिंदखेडराजा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी महिलांच्या जनधन खात्यामध्ये सरकारतर्फे तीन महिन्यांपर्यंत ५०० रुपये जमा करण्यात आले आहेत. दरम्यान, यंदा तालुक्यातील अनेक महिलांना या योजनेचा लाभ मिळण्याची प्रतीक्षा आहे.
घरगुती वादाच्या तक्रारी घटल्या
बीबी : संचारबंदीमुळे सध्या दारू विक्रीही बंद आहे. परिणामी दारुमुळे होणाऱ्या घरगुती वादाच्या तक्रारीत घटल्या आहेत. बिबी पोलीस स्टेशन हद्दीत दारू मिळत नसल्याने मद्यपींची कोंडी झाली आहे. महिलांमधून याचा आनंद साजरा करण्यात येत आहे. बीबी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील २३ गावांवर करडी नजर ठेवलेली आहे.
बाधितांच्या संपर्कात आलेले बिनधास्त
बुलडाणा: सुरुवातीला कोरोनाबाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर राबविण्यात आली होती. मात्र आता रुग्ण वाढल्याने बाधितांच्या संपर्कात आलेल्यांकडे कोणीही लक्ष देत नाही. त्यामुळे बाधितांच्या संपर्कात येणारे नागरिकही बिनधास्त बाहेर पडतात.