तांदळाअभावी पोषण आहार बंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 12:02 AM2017-07-18T00:02:21+5:302017-07-18T00:02:21+5:30
शिक्षण विभागाचे दुर्लक्ष : कार्यवाही करण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदखेडराजा : सिंदखेडराजा तालुक्यात जि.प.प्राथमिक शाळेला पोषण आहाराचा तांदूळ उपलब्ध न झाल्याने विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळणे बंद झाला आहे. या संपूर्ण प्रक्रियेला पंचायत समितीचा शिक्षण विभाग जबाबदार धरल्या जात आहे. हा तांदूळ केव्हा मिळणार, याबाबत समर्पक उत्तर कोणीच देत नसल्याने यातील गोडबंगाल काय, याची चर्चा सुरू आहे.
तालुक्यात जि.प.प्राथमिक आणि माध्यमिक शाळा १८५ च्या जवळपास आहे. शाळा सुरू होऊन तब्बल एक महिना लोटला आहे. या एका महिन्यात किमान १०० क्विंटल तांदूळ पोषण आहारासाठी लागतो. विद्यार्थ्यांची पटसंख्या गृहीत धरुन हा तांदूळ प्रत्येक शाळेला वितरित करण्यात येतो. ही जबाबदारी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाची असते. पं.स.चा शिक्षण विभाग यावेळी एवढा ढेपाळला आहे की, कोणतीही माहिती देण्यासाठी कचरत आहे. सवडदकर नामक गटशिक्षणाधिकारी येथे कार्यरत असताना त्यांची अचानक बदली झाली. आमसभेत विचारलेल्या एकाही प्रश्नाचे सकारात्मक उत्तर त्यांनी दिले नाही. त्यानंतर चौकशी करून लेखी उत्तरही त्यांनी दिले नाही. त्यांच्या बदलीनंतर दादाराव मुसदवाले यांनी चौथ्यांदा गटशिक्षणाधिकाऱ्यांचा कारभार हाती घेतला. त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला तर ते संपर्कात येत नाही. केव्हाही दौऱ्यावर ते असतात. त्यानंतर त्यांच्या जागेवर महेश सुळे यांच्याकडे या विभागाचा कारभार देण्यात आला असल्याचे समजते; पण ते सुट्टीवर असल्याने शिक्षण विभागाचा कारभार रामभरोसे झाला आहे. शालेय पुस्तकाची आजही टंचाई भासत असून, रोहिलेल्या मुलांना पुस्तके केव्हा पुरविणार, हाही प्रश्न निर्माण होतो, तरी याबाबत चौकशी करून शालेय विद्यार्थ्यांना खिचडीपासून वंचित ठेवण्याचे काम करणाऱ्यांची चौकशी करावी, तरी संबंधित दोषीविरुद्ध कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.
जि.प.प्राथमिक शाळेतील मुलांना पहिल्या दिवसापासून पोषण आहार देण्यात यावा, असा सक्त आदेश असताना विद्यार्थ्यांना पोषण आहार का दिल्या जात नाही, याची चौकशी करण्यात यावी.
- दत्ता लष्कर, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती.
एप्रिल महिन्यातच २५ दिवसांचा पोषण आहार प्रत्येक शाळेवर पाठविला होता. काही मुख्याध्यापकांनी तो उतरविला नाही. त्यामुळे २७ जूनला शाळा सुरु होऊनही विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळाला नाही. त्या संबंधित मुख्याध्यापकांवर तातडीने कार्यवाही करण्यात येईल.
- आर.जी.मखमले
शिक्षण विस्तार अधिकारी, पं.स.सिंदखेडराजा.