उन्हाळ्यात लाखो विद्यार्थ्यांची भूक भागवणार शालेय पोषण आहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 05:58 PM2019-04-02T17:58:32+5:302019-04-02T17:58:48+5:30
बुलडाणा: शाळेला उन्हाळी सुट्या लागल्यानंतर दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार दिला जाणार आहे.
- ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा: शाळेला उन्हाळी सुट्या लागल्यानंतर दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार दिला जाणार आहे. जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या दोन लाखावर विद्यार्थ्यांची भूक शालेय पोषण आहारातून भागवली जाणार असून उन्हाळ्यात सर्व विद्यार्थ्यांची बायोमॅट्रीक हजेरी घेतली जाणार आहे.
जिल्ह्यात पर्जन्यमान कमी राहिले व शेतातील उत्पादनातही शेतकºयांना मोठा फटका बसला. त्यामुळे जिल्हा दुष्काळाच्या छायेत सापडला आहे. शेतकºयांना खरीपाचे अपेक्षित उत्पन्न आले नाही. त्यामुळे खरीपाची आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी आली; अशा काही गावांमध्ये शासनातर्फे दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे. दुष्काळग्रस्त भागामध्ये ६ नोव्हेंबर २०१८ पर्यंत जिल्ह्यातील खामगाव, नांदुरा, लोणार, संग्रामपूर, शेगाव, मलकापूर, सिंदखेड राजा व मोताळा या आठ तालुक्यांचा समावेश करण्यात आला होता. त्यानंतर ८ जानेवारी २०१९ रोजी बुलडाणा, चिखली, मेहकर, देऊळगाव राजा, जळगाव जामोद या तालुक्यातील २४६ गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला. दरम्यान, या दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्टीतही शालेय पोषण आहार देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना शाळा कालावधीत पोषण आहार नियमीत दिला जातो; मात्र आता वार्षिक परीक्षा संपल्यानंतरही दुष्काळग्रस्त गावातील जिल्हा परिषदेसह खाजगी अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुटीतही पोषण आहार देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पाहिली ते आठवीपर्यंतच्या जवळपास २ लाख विद्यार्थ्यांना उन्हाळ्यामध्ये शालेय पोषण आहाराचा लाभ देण्यात येणार आहे. त्याचबरोबर उन्हाळ्यात या विद्यार्थ्यांची बायोमॅट्रीक हजेरी घेण्यात येणार आहे. त्यामुळे शालेय पोषण आहारात बोगसपणा करणाºयांची गोची निर्माण झाली आहे. परिणामी स्वरूप उन्हाळ्यातील शालेय पोषण आहाराचे वाटप प्रामाणीकपणे करावे लागणार आहे.
५६ दिवस दिला जाणार आहार
जिल्ह्यात एप्रिल अखेरपर्यंत अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू राहतात. साधारणत: १ मे ते २५ जून पर्यंत उन्हाळी सुट्या असतात. त्यामुळे जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त गावांमधील शालेय विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुटीत दिला जाणारा पोषण आहार सरासरी ५६ दिवस राहणार आहे.
उन्हाळ्यातही राहणार तेच ‘मेनू’
शालेय पोषण आहारामध्ये तूर डाळ, मसूर डाळ, मटकी, वरण भात, खिचडी यासारखे नियमीत मेनू असतात. शैक्षणिक सत्रामध्ये पोषण आहारात नियमीत दिले जाणारेच मेनू उन्हाळी सुटीतही राहणार आहेत. यामध्ये पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना १०० तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दररोज १५० ग्रॅम आहार दिला जाईल.
या शाळांचा समावेश
दुष्काळग्रस्त भागातील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये उन्हाळी सुटीत पोषण आहार दिला जाणार आहे. जिल्हा परिषद शाळेबरोबर खाजगी अनुदानित, अंशत: अनुदानित प्राथमिक, माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना याचा लाभ दिला जाणार आहे.