पौष्टिक ज्वारी खणखणली अन् दडपले गव्हाचे भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:39 AM2021-07-14T04:39:32+5:302021-07-14T04:39:32+5:30

बुलडाणा : आहारात काळानुरूप बदल होत गेला असून पौष्टिकयुक्त ज्वारी ताटातून हद्दपार झाली आहे. पौष्टिकयुक्त ज्वारीचे भाव आता वाढले ...

Nutritious sorghum and crushed wheat prices | पौष्टिक ज्वारी खणखणली अन् दडपले गव्हाचे भाव

पौष्टिक ज्वारी खणखणली अन् दडपले गव्हाचे भाव

Next

बुलडाणा : आहारात काळानुरूप बदल होत गेला असून पौष्टिकयुक्त ज्वारी ताटातून हद्दपार झाली आहे. पौष्टिकयुक्त ज्वारीचे भाव आता वाढले असून तिची जागा गव्हाने घेतली आहे. शहरासह ग्रामीण भागात सारखीच स्थिती आहे.

आहारात पौष्टिकता असणे गरजेचे असल्याने पूर्वी जेवणात विविध कडधान्यांचा वापर होत असे. ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असल्याने शरीराला पटकन ऊर्जा मिळते. ती ऊर्जा मनुष्याला दिवसभर कामी येते. म्हणून पूर्वी व आजही ग्रामीण भागात ज्वारीला प्राधान्य देतात. कमी खाऊनही पोट भरल्याची जाणीव ज्वारीमुळे होत असते. त्यामुळेच आता ज्वारीचे भाव वाढले असून गव्हाचा वापर अधिक प्रमाणात होऊ लागला आहे. ज्वारीच्या सेवनाचे अनेक फायदे आहेत.

आपल्या आरोग्याची श्रीमंतीही ज्वारीतच

ज्वारी ही अत्यंत पौष्टिक असून रक्तदाब आणि हृदयरोग संबंधित आजारावर मात करण्यासाठी ज्वारीचे सेवन करणे गरजेचे आहे. ज्वारीमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि मिनरल्समुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. वाढत्या प्रदूषणामुळे आणि दगदगीच्या आयुष्यामुळे महिलांमध्ये भरपूर समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्यांवर मात करण्यासाठी ज्वारीचे सेवन खूप महत्त्वाचे आहे. ज्वारीत मुबलक प्रमाणात तंतुमय पदार्थ असल्यामळे त्याने पोट साफ होते. ज्यांना अ‍ॅसिडिटीचा त्रास आहे, त्यांनी चपातीऐवजी आहारात ज्वारीची भाकरी खाणे सर्वोत्तम आहे. ज्वारीच्या भाकरीत लोह मोठ्या प्रमाणात असते. अ‍ॅनिमियाचा त्रास असणाऱ्यांनी ज्वारीची भाकरी अवश्य खावी.

............बॉक्स.........

जिल्ह्यात ज्वारीचे उत्पादन घटले

जिल्ह्यात गहू, हरभरा, सोयाबीन, तूर, कापूस आदी पिकांचे उत्पादन होत असते. जवळपास अडीच दशकांपूर्वी ज्वारीचे पीकही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घेतले जायचे. मात्र सद्यस्थितीत जिल्ह्यात ज्वारीची लागवड अत्यल्प प्रमाणात करण्यात येते. त्यामुळे उत्पादन घटल्याने अन्य राज्यातून किंवा जिल्ह्यातूनच आयात केली जाते.

...........प्रतिक्रिया...........

भाकरीच परवडायची म्हणून खायची...

ज्वारी ही महिलांसाठी अत्यंत गुणकारी आहे. आधी आम्ही ज्वारीच्या भाकरीवरच दिवस काढत असू. गव्हाचे भाव जास्त असल्याने पोळी परवडणारी नव्हती.

-साहेबराव सुरवाडे, बोरी अडगाव.

ज्वारी ही अत्यंत पौष्टिक असे धान्य असून याचे सेवन प्रत्येकाने करायलाच हवे. आजची पिढी यापासून वंचित आहे. आरोग्याच्या दृष्टीने भाकरी उत्तम आहे.

-महादेव पाटील,

आता चपातीच परवडते

सध्या गव्हाचे भाव १५ ते २० रुपये प्रतिकिलो तर ज्वारीचे भाव २५ ते ३० रुपये प्रतिकिलो आहेत. यामुळे ज्वारीची भाकरी खाण्यापेक्षा आता चपातीचे सेवन करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे आहे.

-ज्ञानेश्वर मेतकर, बोरी अडगाव.

जिल्हाभरात सध्या ज्वारीचा पेरा मोठ्या प्रमाणात घटला आहे. केवळ जनावरांसाठी चारा मिळावा, म्हणून ज्वारीची लागवड करण्यात येते. यामुळे उत्पादन कमी असल्याने भाव वाढले असून भाकरी श्रीमंतांनाच परवडणारी आहे.

-श्यामसुंदर पाटेखेडे, नायदेवी.

Web Title: Nutritious sorghum and crushed wheat prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.