सिंदखेड राजा येथे ओबीसी आरक्षण बचाव समितीचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 12:27 PM2019-08-01T12:27:57+5:302019-08-01T12:28:07+5:30
ओबीसी विद्यार्थ्यांना व्यावसायीक प्रशिक्षणासाठी शासनाकडुन दिल्या जाणारी शिष्यवृत्ती पुर्ववत चालू करण्यात यावी आदी प्रमुख मागण्यांसाठी बुधवारी सिंदखेड राजा येथे मोर्चा काढण्यात आला.
सिंदखेडराजा : खासगी विना अनुदानित वैद्यकीय महाविद्यालयामध्ये संवैधानिक आरक्षण ओबीसी विद्यार्थ्याकरीता १०० टक्के लागु करण्यात यावे, इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शंभर टक्के फी भरण्याची व्यवस्था शासनाने करावी, नॉन क्रिमिलेअरची अट रदद करावी, ओबीसी विद्यार्थ्यांना व्यावसायीक प्रशिक्षणासाठी शासनाकडुन दिल्या जाणारी शिष्यवृत्ती पुर्ववत चालू करण्यात यावी आदी प्रमुख मागण्यांसाठी बुधवारी सिंदखेड राजा येथे मोर्चा काढण्यात आला.
येथील नागपूर डाक लाईन आढाव गल्लीमधून सकाळी ११ वाजता ओबीसी आरक्षण बचाव समीतीच्या वतीने स्थानिक तहसिल कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. निवेदन तहसीलदार संतोष कणसे यांचे मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना पाठविण्यात आले. खासगी विना अनुदानित वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आर्थिकदृष्टया दुर्बल घटक असलेल्या सवर्ण सवंर्गाला आणि सामाजिक व आर्थीकदृष्टया दुर्बल घटक असलेल्या मराठा संवर्गाला हे आरक्षण १०० टक्के लागू करण्यात आले आहे. सर्वांना समान न्याय या तत्वानुसार सदर संवैधानिक आरक्षण ओबीसी प्रवर्गालाही शंभर टक्के लागू करण्यात यावे. केवळ ५० टक्के एवढेच मिळत आहे. तसेच इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रातील खासगी विना अनुदानीत वैद्यकीय महाविद्यालयातील शैक्षणिक शुल्क ३० ते ४० टक्क्यांनी अधिक आहे.
राज्यातील ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थी हे शुल्क भरण्यास आर्थीकदृष्टया सक्षम नाहीत. त्यामुळे इतर प्रवार्गाप्रमाणे ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांची खासगी विना अनुदानीत महाविद्यालयातील शैक्षणिक शुल्काची १०० टक्के परिपुर्ती शासनाने करावी. तर ओबीसीकरीता नॉन क्रिमिलेअरची मर्यादा आठ लाख रुपये वार्षिक उत्पन्नाची आहे. त्यामुळे शासकीय आणि खासगी अनुदानित वैद्यकीय महाविद्यालयात फी मध्ये ५० टक्के सवलत मिळत नाही. सर्व उन्नत गटातील विद्यार्थ्यांना नॉन क्रिमेलियरची अट रदद करण्यात यावी, ओबीसीच्या विद्यार्थ्यांना व्यावसायीक प्रशिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येत होती. पंरतु महाराष्ट्र शासनाने त्यामध्ये कपात केल्याचे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी नगराध्यक्ष सतिश तायडे, छगनराव मेहेत्रे, भिवसन ठाकरे, योगेश म्हस्के, अतिश तायडे, शिवप्रसाद ठाकरे, अॅड. संदीप मेहेत्रे, बाबुराव खरात, राजेंद्र अंभोरे, लक्ष्मण आढाव, बबन आढाव, जगन ठाकरे, हरिचंद्र चौधरी, कैलास मेहेत्रे, शाम मेहेत्रे, नरहरी तायडे, बालु मेहेत्रे, राजेंद्र आढाव, बाळु म्हस्के, शाम तुकाराम मेहेत्रे, फकीरा जाधव, शेख शकील, शुभांगी मगर, शालिनी तिडके, अनिता मेहेत्रे, प्रतिभा मेहेत्रे, शारदा मेहेत्रे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी पोलीस निरीक्षक अरुण आगे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
(शहर प्रतिनिधी)