२३ नोव्हेंबरपासून स्वीकारणार हरकती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2016 02:39 AM2016-11-18T02:39:59+5:302016-11-18T02:39:59+5:30
पदवीधरांना तपशिलातील चुका दुरुस्त करण्याची संधी.
मोताळा, दि. १७- अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी तालुक्यातील नोंदणी झालेल्या अर्जांंंच्या छाननी प्रक्रियेनंतर तयार करण्यात आलेल्या यादीवरील हरकती व सूचना आगामी २३ नोव्हेंबरपासून स्वीकारल्या जाणार आहेत. याच दिवशी या मतदार यादीचे प्रारूप घोषित केले जाणार आहे. त्यामुळे नाव, पत्ता, शिक्षण, वय अशा वैयक्तिक स्वरूपातील तपशीलातील चुका दुरुस्त करून घेण्यासाठीची ही संधी आहे.
अमरावती पदवीधर मतदारासंघाच्या निवडणुकीसाठी मतदार मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेत अर्ज स्वीकारण्याच्या शेवटच्या दिवसपर्यंंंत मोताळा तालुक्यातून १,१९६ तर जिल्हय़ात ३४,९७७ मतदारांनी नोंदणी केली. प्रशासनाकडे प्राप्त झालेल्या अर्जांची छाननीची प्रक्रिया संपली असून, अर्जासोबत जोडलेल्या कागदपंत्रांची तपासणी करून नाव, पत्ता, छायाचित्रांचे संगणीकरण करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अर्ज नोंदणीदरम्यान शेवटच्या टप्प्यात मोठय़ा प्रमाणात नोंदणी झाल्यामुळे घाई गडबडीत प्रशासनाला प्राप्त झालेल्या अर्जांंंमध्ये त्रुटी आढळून आलेल्या आहेत.
चुकलेल्या अर्जांंंचा निर्णय जिल्हा प्रशासन घेणार असले तरी पदवीधरांना २३ नोव्हेंबर रोजी चूक दुरुस्त करण्याची संधी मिळत आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार पदवीधर मतदारसंघाची प्रारूप यादी २३ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर या काळात प्रत्येक तहसील कार्यालये आणि निवडणूक यंत्रणांच्या कार्यालयात उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधितांनी त्या ठिकाणी जाऊन आपापला तपशील योग्य आहे की, नाही, हे तपासून घ्यायचे आहेत.