कालवा दुरुस्तीच्या तांत्रिक कामात निधीचा खोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 03:54 PM2019-12-15T15:54:14+5:302019-12-15T15:54:38+5:30
एक कोटी ८० लाख रुपयांचा निधी उपलब्ध न झाल्याने समस्या निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये महत्तम पाणी यंदा पावसाळा उशिरा संपल्याने उपलब्ध झाले असले तरी कालवा दुरुस्तीच्या तांत्रिक कामासाठी गरज असलेल्या एक कोटी ८० लाख रुपयांचा निधी उपलब्ध न झाल्याने समस्या निर्माण झाली आहे.
या वर्षी पावसाळा उशिरा संपला. सोबतच अकाळी पावसामुळेही जिल्ह्यातील प्रकल्पांवरील कालव्यांचे नुकसान झाले आहे. बऱ्याच प्रकल्पाच्या ठिकाणी विमोचकाच्या दुरुस्तीची गरज आहे. पेनटाकळी प्रकल्पावरील ४९ किमी लांबीच्या कालव्यापैकी २० किमीच्या कालव्याच्या स्वच्छतेचे व दुरुस्तीचे काम काही प्रमात पूर्ण झाले असले तरी उर्वरित कामे मात्र अद्याप बाकी आहे. अशी स्थिती अन्य ठिकाणच्या प्रकल्पावरील कालव्यांची आहे. पाटबंधारे विभागच्या दृष्टीने यंदा पावसाळा उशिरा संपल्यामुळे आतापर्यंत शेतकऱ्यांकडून पाण्याची अपेक्षीत मागणी होत नव्हती. मात्र आता ही मागणी वाढत आहे. मात्र कालव्यांची अपेक्षीत दुरुस्ती न झाल्यामुळे उपलब्ध पाणी सोडायचे कसे असा प्रश्न काही ठिकाणी आहे.
दरम्यान, १४ नोव्हेंबर रोजी पाणी आरक्षण समितीच्या बैठकीमध्ये जिल्ह्यातील प्रकल्पांवरील कालव्यांच्या दुरुस्तीसाठी तथा स्वच्छतेसाठी जवळपास पाच कोटी रुपायंची गरज असल्याचे वरिष्ठांच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते. त्यातच आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात झालेल्या परतीच्या व अवकाळी पावसामुळे कालवे क्षतीग्रस्तही झालेले होते. त्यामुळे त्यांच्या दुरुस्तीसाठी निधीची नितातंत गरज असल्याची भूमिका अधिकाºयांनी बैठकीत मांडली होती. त्यानुषंगाने विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाके (व्हीआयडीसी) विशेष निधीची मागणी करण्यात आली होती. मात्र अद्याप हा निधी उपलब्ध झालेला नाही.
समृद्धी महामार्गाची कामे आणि अतिवृष्टीमुळे जिल्हयातील जवळपास ३०० किमी लांबीच्या मोठ्या प्रकल्पावरील कालव्यांच्या दुरुस्तीची समस्या आहे. सध्या कालवे स्वच्छतेची कामे दोन कोटी रुपयांच्या निधीतून करण्यात येत आहेत.
झाडा-झुडपांमुळे अडचण
जिल्ह्यात गेल्या तीन ते चार वर्षापासून अवर्षण सदृश्य स्थिती होती. त्या कालावधीत कालव्यातून पाणी सोडण्यात आले नव्हते. त्यामुळे या कालव्यांमध्ये झाडे, झुडपे वाढली आहेत. त्यामुळे कालव्यांमध्ये पाणी सोडण्याची तयारी कशी करावी, असा प्रश्न असल्याचे एका अधिकाºयाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. काही ठिकाणी कालव्यांची तांत्रिक कामेही करणे गरजेचे आहे.
पेनटाकाळी प्रकल्पावरील कालव्याच्या स्वच्छतेसाठी साडेपाच लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता. त्यातून काही कामे करण्यात आली.जवळपास निम्म्या कालव्याच्या स्वच्छतेचे काम बाकी आहे. मेहकर तालुक्यात सर्वाधिक असे १६ टक्के सिंचन होते. ही कामे होणे गरजेचे आहे.
तांत्रिक कामांसाठीचा निधी उपलब्ध झालेला नाही. एक कोटी ८० लाख रुपयांचा हा निधी आहे. कालवा स्वच्छतेची कामे सुरू आहेत.
- अनिल कन्ना,
कार्यकारी अभियंता,
बुलडाणा पाटबंधारे विभाग