हगणदरीमुक्ती कागदावरच : शौचालये बांधली; मात्र वापर नाहीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 12:09 PM2020-12-15T12:09:19+5:302020-12-15T12:15:26+5:30
Buldhana News शाैचालये बांधण्यात आली आहेत; मात्र जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये त्यांचा वापरच हाेत नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत काेट्यवधी रुपयांचा खर्च करून घराेघरी शाैचालये बांधण्यात आली आहेत; मात्र जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये त्यांचा वापरच हाेत नसल्याचे धक्कादायक वास्तव समाेर आले आहे. एवढेच नव्हे तर पुरस्कार मिळविणाऱ्या गावातही हगणदरी कायम असल्याचे चित्र आहे.
शाैचालय बांधण्यासाठी राज्य शासन काेट्यावधी रुपयांचे अनुदान देते. पाच वर्षात ३ लाख ८४ हजार २२७ शाैचालये बांधण्यात आली आहेत. शाैचालयांचे उद्दिष्ट पूर्ण झाली असली तरी ग्रामस्थ त्याचा वापरच करत नसल्याचे अमडापूर, डाेणगावसह इतर गावांमध्ये आढळले. गावांमध्ये केवळ अनुदान घेण्यासाठी शाैचालये बांधण्यात आली आहेत. अनेक गावांमध्ये शाैचालय अनुदानातही माेठ्या प्रमाणात गैरप्रकार झाले आहेत. एकाच लाभार्थ्यांना दाेनदा अनुदान देण्यात आले आहेत. याची कुठलीही पडताळणी हाेत नसल्याने गैरप्रकार समाेर आला नाही. तसेच शाैचायलांचा वापर ग्रामस्थ करीत आहेत किंवा नाही याविषयी ग्रामंपचायत प्रशासन कुठलीही पडताळणी करीत नसल्याने शाैचालये अडगळीत पडल्याचे चित्र जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये आहे. त्यामुळे शाैचालयांचा वापर न करणाऱ्यांवर कारवाईची गरज आहे. तसेच ग्रामीण भागात गुड माॅर्निंग पथके कार्यान्वित करण्याची गरज आहे.
शौचालयांचा वापर इंधन ठेवण्यासाठी
जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये इंधन ठेवण्यासाठी शाैचालयाचा वापर करण्यात येत आहे. तसेच काही ठिकाणी शाैचालयांना कुलूप लावण्यात आले आहे. शाैचालयांना पाणी जास्त लागते. ग्रामीण भागात कायम पाणीटंचाई असते. त्यामुळेही शाैचालयांचा वापर हाेत नसल्याचे चित्र आहे. काही ग्रामस्थांची मानसिकता कायम आहे.
‘जैसे थे’ स्थिती
हगणदरीमुक्त झालेल्या गावांना राज्य व जिल्हा स्तरावर पुरस्कार देण्यात आलेले आहेत; मात्र पुरस्कार मिळाल्यानंतर या गावांमध्ये हगणदारी कायम असल्याचे चित्र आहे. अनेक गावे केवळ कागदावरच हगणदरीमुक्त झाल्याचे चित्र आहे.
ऐनखेड गावाला सन २०१५,१६ हगणदरीमुक्त ग्रामचा पुरस्कार मिळाला हाेता. ६०० लाेकसंख्या असलेल्या गावात घराेघरी शाैचालये बांधण्यात आली आहे. तसेच त्याचा वापरही ग्रामस्थ करीत आहेत.
- श्रीकांत गिऱ्हे,
माजी सरपंच, ऐनखेड