गोदरीत पहारा; उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर रात्रीला ‘वॉच’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 06:11 PM2018-12-02T18:11:46+5:302018-12-02T18:13:03+5:30
बुलडाणा: संपूर्ण गाव हगणदरी मुक्त करण्यासाठी पुढाकार घेतलेल्या शिक्षकांच्या परिश्रमाला गावकऱ्यांची साथ मिळाल्याने जिल्ह्यातील अंत्री देशमुख हे गाव हगणदरी मुक्त झाले. उघड्यावर बसणाऱ्यांवर रात्रीला जागरण करून गावा लगतच्या गोदरीमध्ये वॉच ठेवला जात आहे.
- ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा: संपूर्ण गाव हगणदरी मुक्त करण्यासाठी पुढाकार घेतलेल्या शिक्षकांच्या परिश्रमाला गावकऱ्यांची साथ मिळाल्याने जिल्ह्यातील अंत्री देशमुख हे गाव हगणदरी मुक्त झाले. परंतू या गावात आता गोदरीमुक्तीनंतरची कसरत पाहावयास मिळत आहे. सर्वांचे घरी शौचालय असतानाही काही लोकांकडून उघड्यांवर बसण्याचे प्रकार होतात, त्यामुळे याठिकाणी उघड्यावर बसणाऱ्यांवर रात्रीला जागरण करून गावा लगतच्या गोदरीमध्ये वॉच ठेवला जात आहे.
राज्यभर हगणदरी मुक्तीसाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यात जिल्हा परिषदचे शिक्षकही मागे राहिले नाहीत. मेहकर तालुक्यातील अंत्री देशमुख येथील जि. प. शिक्षक पी. एस. देशमुख, विकास वाझुळकर व इतर शिक्षकांनी संपुर्ण गाव हणदरीमुक्त करण्याचे कार्य २६ जानेवारी २०१७ मध्ये हाती घेतले होते. त्यानुसार सुरूवातीला विरोध, राजकीय द्वेष अशा अनेक अडचणी शिक्षकांना आल्या. मात्र हळुहळू विद्यार्थ्यांच्या मदतीने पालकांची मानसीकता बदलविण्यात या शिक्षकांना यश आले. विद्यार्थीनींच्या भाषणातून गावात शौचालय बांधकामाची जागृती निर्माण करण्यात आली. संपूर्ण गाव हगणदरीमुक्त करण्यासाठी ४४९ शौचालयाचे बांधकाम करणे अपेक्षीत होते. परंतू त्यासाठी लागणारा खर्च कसा भागवायचा, शासनाच्या अनुदानास होणारा विलंब यामध्ये शिक्षकांनी स्वत: च्या खिशाला झळ बसवत शौचालय बांधकामाचा उपक्रम हाती घेतला. यावेळी गावातील संदिप देशमुख यांनी ७५ हजार रुपये व सुरेश देशमुख यांनी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत केली. त्यावर ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या सहकार्याने शौचालय बांधकामाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत गेला. वर्षभरात संपूर्ण गाव हगणदरीमुक्त करण्यात शिक्षक पी. एस. देशमुख यांना यश आले. हगणदरीमुक्तीनंतरही काही लोक उघड्यावर शौचास बसण्याचे सोडत नसल्याचे दिसून आल्याने अंत्री देशमुख ग्राम पंचायत सदस्यांनी गावाला लागून असलेल्या सर्वच गोदरीमध्ये रात्रीला जागरण करून लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सुरेश देशमुख व ग्रामपंचायत सदस्यांनी दररोज रात्री ११ वाजेपर्यंत व सकाळी तीन ते चार वाजेपासून गोदरीमध्ये पहारा देण्याचा नविन उपक्रम सुरू केला आहे. यामुळे येथे उघड्यावर बसणाºयांना आळा घालण्यात आला असल्याचे चित्र आहे.
घरात बांधले शौचालय
अंत्री देशमुख येथे घरोघरी शौचालय बांधकाम करण्यासाठी प्रयत्न सुरू केले असता, अनेक अडचीण समोर आल्या. यामध्ये आर्थिक अडचण प्रामुख्या ने दिसून आली. मात्र आर्थिक मदतीतून हा प्रश्न सुटला. त्यानंतर अनेकांकडे शौचालय बांधकामासाठी जागा नसल्याचे दिसून आले. मात्र यातील काही गोरगरीब कुटूंबांनी घरातच शौचालय बांधकाम केल्याने इतरांसमोर एक आदर्श निर्माण झाला.
हगणदरीमुक्ती मागे विद्यार्थ्यांचे मोठे सहकार्य
अंत्री देशमुख हगणदरीमुक्तीसाठी प्रयत्न सुरू केले असता, यात विद्यार्थ्यांचे मोठे सहकार्य लाभले. पालकांसमोर या विद्यार्थ्यांनी शौचालय बांधण्याचा हट्ट केल्याने हा प्रश्न लवकर सुटू शकल्याची माहिती शिक्षक पी. एस. देशमुख यांनी दिली.