परदेश दौऱ्याची माहिती लपविणाऱ्याविरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 05:15 PM2020-03-24T17:15:08+5:302020-03-24T17:15:25+5:30
मोताला तहसिलदारांच्या निर्देशानुसार हा गुन्हा ६५ वर्षीय व्यक्तीविरोधात दाखल करण्यात आला आहे
धामणगाव बढे: कोरोना बाधीत देशातून प्रवास करून आल्यानंतरही त्याबाबतची माहिती आरोग्य विभागास न देता ती दडविल्याप्रकरणी धामणगाव बढे येथील एका व्यक्ती विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मोताला तहसिलदारांच्या निर्देशानुसार हा गुन्हा ६५ वर्षीय व्यक्तीविरोधात दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी धामणगाव बढे येथील ग्रामसेवक पंजाबराव मोरे यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा आधार घेत प्रकरणी पोलिसात तक्रार दिली. त्यावरून संबंधीत व्यक्ती विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धामगाव बढे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधीत व्यक्ती १३ मार्च रोजी सौदी अरेबियातून मुंबई विमानतळावर आला होता. १४ मार्च रोजी धामगाव बढे येथे तो आला. कोरोना बाधीत देशातून प्रवास केल्यानंतरही त्या विषयाची माहिती कोरोना नियंत्रण कक्ष व एकात्मिक रोग सर्व्हेक्षण प्रकल्प कक्षास दिल्या गेली नाही. वास्तविक १४ मार्च २०२० च्या अधिसुचनेनुसार ती देणे बंधनकारक आहे. परिणामी शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती मिळाल्यानंतर धामणगाव बढे प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. सतिष नारखेडे यांनी संबंधीत व्यक्तीच्या घरी जावून चौकशी केली असता संबंधीत व्यक्तीने कुठलीही माहिती दिली नाही. त्यामुळे शासनाच्या आदेशाचे उल्लंघन झाले. प्रकरणी संबंधीत व्यक्ती विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ नुसार शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकारामुळे मोताळा तालुक्यात खळबळ उडाली आहे. एक दिवसा अगोदरच वडगाव खंडोपंत येथील दोघांनी होम क्वारंटीनमध्ये राहण्याच्या आदेशाचे उल्लंघन केले होते. त्यामुळे त्यांच्या विरोधात २३ मार्च रोजीच गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतरचा हा जिल्ह्यातील दुसरा गुन्हा असून एकट्या मोताळा तालुक्यात हे गुन्हे दाखल झाले आहेत.