नियोजित वधूचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल; उपवरासह पित्याविरोधात गुन्हा
By अनिल गवई | Published: April 26, 2023 09:37 PM2023-04-26T21:37:07+5:302023-04-26T21:37:20+5:30
बदनामी थांबविण्यासाठी तीन लाखाची मागणी
खामगाव (बुलढाणा) : मुलगा नोकरीवर असल्याचे खोटे सांगून, एका मुलीशी लग्न ठरविले. त्यानंतर मुलाची वस्तुस्थिती समोर आल्यानंतर, मुलीकडील मंडळीने विवाह रद्द केला. याचा संताप अनावर न झालेल्या उपवर पुत्रासह पित्याने नियोजित वधूचे आक्षेपार्ह फोटो समाज माध्यमात व्हायरल केले. याप्रकरणी पीडितेच्या पित्याच्या तक्रारीवरून हिवरखेड पोलिसांनी दाेघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन्ही आरोपी फरार झाले आहेत.
याप्रकरणी हिवरखेड पोलिस स्टेशनमध्ये दाखल तक्रारीनुसार, परिसरातील एका गावातील २१ वर्षीय तरुणीचा विवाह गावातील एका मुलाशी ठरला. विवाह ठरविताना मुलगा न्यायालयात नोकरीवर असल्याचे मुलीकडील मंडळीला सांगण्यात आले; मात्र प्रत्यक्षात लग्न ठरलेला मुलगा नोकरीवर नसल्याची वस्तुस्थिती समोर आल्याने मुलीकडील मंडळीने नियोजित स्थळ नाकारले. याचा संताप अनावर न झालेल्या उपवरासह त्याच्या वडिलांनी नियोजित वधूचे आक्षेपार्ह फोटो समाज माध्यमात व्हायरल केल्याचा आरोप मुलींकडील मंडळीने तक्रारीत केला.
बदनामी थांबविण्यासाठी तीन लाखाची मागणी
संबंधित मुलीचा दुसऱ्या ठिकाणी होणारा विवाह मोडून, बदनामी थांबविण्यासाठी तीन लाखांची मागणी केली व पैसे न दिल्यास मुलीचा कुठेही विवाह होऊ देणार नसल्याची धमकी उपवरासह पित्याने दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला. या तक्रारीवरून हिवरखेड पोलिसांनी प्रदीप साबळे, झामसिंग साबळे यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ४१७, ३५४ क, ड, ५०६, ३४ व सहकलम ६६ क माहिती व तंत्रज्ञान अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास हिवरखेड पोलिस करीत आहेत.