विशिष्ट समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, परभणीच्या महाराजावर गुन्हा दाखल
By सदानंद सिरसाट | Published: March 26, 2023 05:31 PM2023-03-26T17:31:06+5:302023-03-26T17:31:15+5:30
२१ मार्च रोजी नांदुरा तालुक्यातील बरफगाव येथे आयोजित कीर्तनात गिरीगावकर यांनी ते वक्तव्य केले.
खामगाव (बुलढाणा) : कीर्तनाच्या कार्यक्रमात एका विशिष्ट समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने परभणी जिल्ह्यातील शेलू येथील हभप बाळू महाराज गिरीगावकर यांच्याविरुद्ध दाखल तक्रारीनुसार विविध कलमान्वये खामगाव तालुक्यातील पिंपळगावराजा पोलिसात २५ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
२१ मार्च रोजी नांदुरा तालुक्यातील बरफगाव येथे आयोजित कीर्तनात गिरीगावकर यांनी ते वक्तव्य केले. बफगाव येथे संत दत्तूजी महाराज पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त कीर्तनासाठी हभप बाळू महाराज गिरीगावकर यांना निमंत्रित करण्यात आले. २१ मार्च रोजी कीर्तन करत असताना त्यांनी एका समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान केले. त्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्याने नांदुरा खुर्द येथील राहुल मनोहर चोपडे (३०) यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यामध्ये हभप गिरीगावकर यांनी कीर्तनामध्ये समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान केले. यावेळी मंचावर आणि समोर मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
त्यावेळी गिरीगावकर यांनी त्या समाजाबद्दल बुट चाटणारे लोक, त्यांना अक्कल नसते, ते बोकड कापल्यावर लिंबू-कांदा घेऊन जातात. स्तुती करण्याची कवडीची अक्कल नाही, त्यांनाही राज दरबारी स्थान आहे, अशा प्रकारे बोलून समाजाची बदनामी केली, असे नमूद केले आहे. तसेच सांस्कृतिक व धार्मिक बदनामी करून भावना दुखावल्या.
कीर्तनाचा समाजाशी कोणताही संबंध नसताना त्यांनी बेताल वक्तव्य केले. त्याद्वारे जाणीवपूर्वक बदनामी केल्याचे म्हटले. त्या तक्रारीवर योगेश नवले, विशाल नवले, संदीप नवले, कैलास सोनोगे, शुभम शिरसाट, रामेश्वर चोपडे, कमलाकर सोनवणे, गजानन नवले, विशाल सुभाष नवले, शुभम चोपडे, मिलिंद नवले, जुगल नवले यांनी स्वाक्षरी केल्या आहेत. तक्रारीवरून पिंपळगावराजा पोलिसांनी भादंविच्या कलम ५०५ (१) (क) नुसार अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. पुढील तपास हेकाँ रामेश्वर बाेरसे करीत आहेत.