अधिकृत वीजजोडणीकडे मंडळांची पाठ!
By admin | Published: September 20, 2015 11:36 PM2015-09-20T23:36:55+5:302015-09-20T23:36:55+5:30
बुलडाणा जिल्ह्यात केवळ ४२ गणेश मंडळांनीच घेतली अधिकृत वीज जोडणी.
बुलडाणा : गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक गणेश मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घ्यावी, या महावितरणच्या आवाहनाला गणेश मंडळांनी चांगलाच शॉक दिला असून, अधिकृत वीजजोडणीकडे मंडळांनी पाठ फिरवली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत फक्त ४२ गणेश मंडळांनीच अधिकृत जोडणी घेतली आहे. ज्या मंडळांनी अनधिकृत जोडणी केली आहे, त्याच्या सदस्यांना महावितरण कंपनीचे दामिनी पथक भेटून अधिकृत जोडणी घेण्याची सक्ती करीत आहे. बुलडाणा जिल्ह्यात सार्वजनिक ८८७ गणेश मंडळांची स्थापना झाल्याची नोंदणी पोलिसांकडे झाली असली तरी आणखी छोटी-मोठीे अनेक मंडळे आहेत, ज्यांची नोंदणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे गणेश मंडळांची संख्या मोठी आहे. गणेशोत्सव काळात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता आणि देखाव्यांची भव्यता पाहता अनधिकृत जोडणी प्रसंगी धोकादायक ठरू शकते. अनेक गणेश मंडळे जवळच्या महावितरणच्या पोलवरून अनधिकृतपणे वीजजोडणी करून घेतात. यावर्षी श्रीगणेश १0 दिवसांसाठी भक्तांच्या भेटीला आले आहेत. या १0 दिवसांसाठी कशाला अधिकृत वीजजोडणी घ्यायची, असा विचार करून अनेक गणेश मंडळांनी तारांवर आकोडे टाकले आहेत, तर काहींनी मंडळाचे सदस्य, परिसरातील व्यापारी, दुकाने, चक्की तसेच मिळेल तेथून तात्पुरता वीजपुरवठा घेतला आहे. बुलडाणा शहरातील फक्त आठ गणेश मंडळांनी आजपर्यंत अधिकृतरीत्या अर्ज देऊन वीजजोडणी घेतली आहे. याशिवाय चिखली शहरात सात, सिंदखेडराजा एक, खामगाव १0, शेगाव १0, लोणार तीन व मलकापूर शहरात तीन असे एकूण ४२ गणेश मंडळांनी अधिकृत जोडणी घेतली आहे. जिल्ह्यात अनधिकृत जोडणी घेणार्या उर्वरित मंडळांची संख्या हजारोंच्या घरात आहे. त्यामुळे महावितरणाला लाखो रुपयांचा फटका बसण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवानंतर दिवाळीपर्यंत येणार्या उत्सवांच्या काळात मोठय़ा प्रमाणात वीजवापर होणार आहे. अनधिकृत वीजजोडणी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे गणेश मंडळांनी अधिकृत जोडणी घ्यावी, यासाठी महावितरण प्रयत्न करीत आहे.