ऑफलाइन उमेदवारी अर्ज स्वीकारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:44 AM2020-12-30T04:44:00+5:302020-12-30T04:44:00+5:30
बुलडाणा : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी निवडणूक आयाेगाने ऑनलाइन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सुविधा दिली हाेती. मात्र, २९ डिसेंबर राेजी वेबसाइटमध्ये ...
बुलडाणा : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी निवडणूक आयाेगाने ऑनलाइन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सुविधा दिली हाेती. मात्र, २९ डिसेंबर राेजी वेबसाइटमध्ये तांत्रिक बिघाड आल्याने अनेक उमेदवारांना अर्जच भरता आला नाही. त्यामुळे, निवडणूक आयाेगाने २९ आणि ३० डिसेंबर राेजी ऑफलाइनही अर्ज स्वीकारण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे, जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यातील ५२७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नव्हता. त्यानंतर सलग सुट्या आल्याने २८ डिसेंबरपासून इच्छुक उमेदवारांची गर्दी हाेत आहे. तसेच राज्यभरात ग्रामपंचायत निवडणूक असल्याने वेबसाइटवर भार वाढला आहे. शेवटचे दाेन दिवस राहिल्याने मंगळवारी सर्वच उमेदवार अर्ज भरण्याचा प्रयत्न करीत असल्याने वेबसाइटमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाला हाेता. ग्रामीण भागात तर आधीच नेटवर्क राहत नसल्याने इच्छुक उमेदवारांनी रात्री जागरण करून अर्ज भरले तर अनेकांना अर्ज भरताच आला नाही. त्यामुळे, निवडणूक आयाेगाने २९ डिसेंबर राेजी परिपत्रक काढून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पारंपरिक पद्धतीने ऑफलाइनही अर्ज घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच ३० डिसेंबर राेजी ऑनलाइन आणि ऑफलाइन दाेन्ही पद्धतीने उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार असून, वेळ ५.३० वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे.
जातपडताळणीही ऑफलाइन
आरक्षित जागांवर निवडणूक लढवू इच्छीणाऱ्या उमेदवारांची जात पडताळणीसाठी गर्दी वाढली आहे. एकाच वेळी सर्व उमेदवार प्रस्ताव सादर करण्याचा प्रयत्न करीत असल्याने वेबसाइट संथगतीने काम करीत आहे. त्यामुळे अनेकांचे प्रस्तावच दाखल झाले नाहीत. २९ आणि ३० डिसेंबर राेजी जात पडताळणीचे प्रस्ताव ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दाेन्ही पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहेत.