जुने ते सोने, मातीच्या मूर्तींकडे भक्तांचा कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:41 AM2021-09-10T04:41:45+5:302021-09-10T04:41:45+5:30
बुलडाणा : पूर्वीच्या काळी घरोघरी मातीचे गणपती बनवून त्यांची स्थापना केली जायची. आता पर्यावरण संवर्धनाविषयी बऱ्यापैकी जागृती होत असल्याने ...
बुलडाणा : पूर्वीच्या काळी घरोघरी मातीचे गणपती बनवून त्यांची स्थापना केली जायची. आता पर्यावरण संवर्धनाविषयी बऱ्यापैकी जागृती होत असल्याने जुने ते सोने असे मानून पुन्हा मातीच्या मूर्तीकडे भक्तांचा कल वाढत आहे. बुलडाण्यातील एक महिला गेल्या सहा वर्षांपासून शाडू मातीच्या मूर्ती घडवते. आता हळूहळू लोकांना या मूर्तीचे महत्त्व पटत असून, पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी मातीच्या मूर्तींची खरेदी वाढली आहे. विविध सणांमध्येही पर्यावरण संवर्धनाकडे विशेष लक्ष दिले जात आहे. त्यामध्ये गणेशोत्सव हा पर्यावरणपूरक कसा होईल, यासाठी जिल्ह्यात वेगवेळ्या सामाजिक संस्था काम करत आहेत. बुलडाण्यातील स्वाती प्रवीण व्यवहारे या गेल्या सहा वर्षांपासून पर्यावरणपूरक गणपतीची निर्मिती करतात. एका वर्षी साधारणत: १०० ते १२० गणरायांच्या मूर्ती त्या बनवितात. ही मूर्ती पूर्णत: शाडूच्या मातीपासून बनवलेली असते. त्यामुळे त्याचा पर्यावरणाला कुठलाही धोका राहत नाही. ही मूर्ती मातीची असल्याने पाण्यात सहज विरघळते. पर्यावरणपूरक मूर्ती बनविण्यासाठी स्वाती व्यवहारे यांना त्यांचे पतीही सहकार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले.
सरकारच्या सूचनांचे होईल पालन
कोरोनामुळे गणेशोत्सवावर अनेक निर्बंध आलेले आहेत. त्यासाठी शासनानेही काही सूचना दिलेल्या आहेत. त्यामध्ये गणरायाची मूर्ती शाडूच्या मातीची असल्यास तिचे विसर्जन शक्यतो घरी करावे, घरी शक्य नसल्यास नजीकच्या कृत्रिम विसर्जनस्थळी विसर्जन करावे. सार्वजनिक मंडळांच्या गणपतीची उंची कमाल चार फूट, तर घरगुती गणपतीची उंची कमाल २ फूट असावी, अशा सूचना आहेत. भक्तांनी पर्यावरणपूरक शाडूच्या मूर्ती खरेदी केल्यास शासनाच्याही सर्व नियमांचे पालन होऊ शकते.
एका मूर्तीला लागतात सहा तास
शाडूच्या मातीची एक गणपतीची मूर्ती घडविण्यासाठी साधारणत: सहा तासांचा कालावधी लागतो. त्यामुळे एका दिवसात एक ते दोनच मूर्ती बनविण्यात येतात. त्यामुळे दोन ते तीन महिन्यांपूर्वी गणरायाच्या मूर्ती घडविण्याचे काम सुरू करण्यात येत असल्याची माहिती व्यवहारे यांनी दिली.
मातीच्या मूर्तींना प्रतिसाद
सुरुवातीला शाडू मातीच्या गणरायांच्या मूर्तीला भाविकांचा प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र, आता पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी मातीच्या मूर्ती घेण्यासाठी भक्तांचा प्रतिसाद चांगला मिळत आहे. बुलडाण्यातील चैतन्यावाडी परिसरात राहणाऱ्या स्वाती प्रवीण व्यवहारे यांनी शाडूच्या मातीपासून बनविलेल्या गणपतीच्या मूर्ती दिसायलाही सुंदर आणि आकर्षक आहेत. अर्ध्या फुटापासून ते सव्वा फुटापर्यंत या मूर्ती बनवतात. त्यामुळे त्यांनी साकारलेल्या मूर्तींना गणेश भक्तांकडून चांगली मागणी आहे.
१०० मूर्ती बनविण्यासाठी असे लागते साहित्य
शाडू माती : १२० किलो
रंग : ४ लिटर
चमकी : १ किलो