बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध जागीच ठार; ज्ञानगंगा अभयारण्यातील माटरगाव धरणाजवळील घटना
By संदीप वानखेडे | Published: February 13, 2024 09:06 PM2024-02-13T21:06:07+5:302024-02-13T21:06:33+5:30
रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा जंगलात शाेध घेतला
बुलढाणा : चरायला साेडलेल्या गुरांना शाेधण्यासाठी गेलेल्या ६० वर्षीय वृद्धावर बिबट्याने हल्ला केला. यामध्ये वृद्धाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना १२ फेब्रुवारी राेजी दुपारी ४ वाजता घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. बाजीराव मांगीलाल चव्हाण, रा. माटरगाव, असे मृत वृद्धाचे नाव आहे. कुटुंबीयांनी त्यांचा शाेध घेतला असता १४ फेब्रुवारी राेजी त्यांचा मृतदेह आढळल्याने ही घटना समाेर आली.
मिळालेल्या माहितीनुसार माटरगाव येथील बाजीराव चव्हाण यांच्याकडे गुरे आहेत. त्यातील एक जंगलात बेपत्ता झाले हाेती. त्याला शाेधण्यासाठी मांगीलाल चव्हाण हे १२ फेब्रुवारी राेजी माटरगाव येथील धरणाजवळ गेले हाेते़, दरम्यान, यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यांना १०० मीटरपर्यंत फरफटत जंगलात नेले. यामध्ये त्यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा जंगलात शाेध घेतला असता १३ फेब्रुवारी राेजी एका वनमजुराला एक मृतदेह आढळला. त्यांनी तातडीने ही माहिती वन अधिकाऱ्यांना दिली.
अकोला डीएफओ अनिल निमजे, खामगाव आरएफओ लोखंडे, बुलढाणा आरएफओ चेतन राठोड तथा हिवरखेड पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेहाविषयी चाैकशी केली असता ताे बाजीराव चव्हाण यांचा असल्याचे समाेर आले. मृतेदह उत्तरीय तपासणीसाठी खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले.