तलावातून दीड हजार ब्रास गौण खनिजाची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 05:23 PM2019-06-23T17:23:50+5:302019-06-23T17:24:45+5:30
खामगाव तालुक्यातील बोरजवळा येथील तलावातून १९ आणि २० जून रोजी सलग दोन दिवस हजारो ब्रास मुरूमाची चोरी करण्यात आली.
- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : गत काही दिवसांपासून तालुक्यात गौण खनिज चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे दिसते. खामगाव तालुक्यातील बोरजवळा येथील तलावातून १९ आणि २० जून रोजी सलग दोन दिवस हजारो ब्रास मुरूमाची चोरी करण्यात आली. हा धक्कादायक प्रकार स्थानिकांनी महसूल प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला. मात्र, तरीही तब्बल दोन दिवस मंडळ अधिकारी घटनास्थळी पोहोचले नाहीत. त्यामुळे तालुक्यातील संघटीत गौण खनिज चोरीला महसूल प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाºयांचे पाठबळ असल्याचे विविध घटनांवरून दिसून येत आहे.
खामगाव तालुक्यातील बोरजवळा येथील केदारेश्वर मंदिरा जवळ एक पुरातन तलाव आहे. या तलावातून १९ आणि २० जून रोजी दिवस रात्र हजारो ब्रास मुरूमाची चोरी करण्यात आली. दोन जेसीबी आणि ८-१० ट्रॅक्टरच्या साहाय्याने उचल करण्यात आलेल्या या मुरूमाचा खासगी शेत रस्त्यासाठी तर एका निर्माणाधिन पेट्रोलपंपासाठी वापर करण्यात आला. खासगी शेत रस्ता हा बोरजवळा शिवारातील एका राजकीय नेत्याचा तर, निपाणा येथील निर्माणाधीन पेट्रोलपंप खामगाव येथील एका व्यक्तीचा असल्याचे समजते. दरम्यान, हा प्रकार चव्हाट्या आल्यानंतर ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे तक्रार केली. या तक्रारीच्या अनुषंगाने तहसीलदारांनी मंडळ अधिकाºयांना तात्काळ तपासणी आणि चौकशीच्या सूचना दिल्या. मात्र, तब्बल दोन लोटल्यानंतरही मंडळ अधिकारी तेथे पोहोचले नाहीत. गौण खणिज चोरी करणाºयांनी जेसीबी आणि ट्रॅक्टर घटनास्थळावरून हलविल्यानंतर अखेर शुक्रवारी दुपारी तलाठी वैशाली गवळी बोरजवळा येथील तलावावर पोहोचल्या. कल्याणसिंह तोमर, मेहेरबानसिंह तोमर, पोलिस पाटील ईश्वरसिंह तोमर, राजेंद्र दिवनाले, भागवत तोमर, श्याम जाधव यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. पंचनाम्याचा अहवाल तलाठी गवळी यांनी वरिष्ठ स्तरावर सादर करण्यात आला. यासंदर्भात तहसीलदार शीतल रसाळ आणि मंडळ अधिकारी किशोर रत्नपारखी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी फोन घेतला नाही. त्यामुळे त्यांची प्रतिक्रीया मिळू शकली नाही.
मंडळ अधिकारी ‘नॉट रिचेबल’!
बोरजवळा येथील तलावातून मुरूमाची चोरी होत असल्याचा प्रकार ग्रामस्थांनी तहसीलदारांना १९ जून रोजी कळविला. त्यांनी तात्काळ मंडळ अधिकाºयांना तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले. मात्र, तब्बल दोन दिवसांपर्यंत मंडळ अधिकारी घटनास्थळी पोहोचले नाहीत. त्यानंतर शुक्रवारी जेसीबी आणि साहित्य घटनास्थळावरून लांबविण्यात आले. त्यानंतर शुक्रवारी दुपारी तलाठी पंचनाम्यासाठी उपस्थित झाल्या. त्यामुळे गौण खनिज चोरट्यांचे महसूल प्रशासनाशी साटेलोटे असल्याचा आरोप बोरजवळा येथील ग्रामस्थांनी केला आहे.
साडेपाच लाख रुपयांचा चूना!
तलावात चार मोठे खड्डे खोदण्यात आले. या खड्यातून सुमारे एक ते दीड हजार ब्रास मुरूमाची चोरी करण्यात आली. विना रॉयल्टी मुरूमाचा उपसा झाल्याने तब्बल साडेपाच लाख रुपयांचा चूना प्रशासनाला लागला असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये होत आहे.
वरिष्ठ स्तरावरून चौकशीचे आदेश मिळताच बोरजवळा येथील तलावाला भेट दिली. चोरी गेलेल्या गौण खनिजाची मोजणी केली. यासंदर्भात सविस्तर अहवाल वरिष्ठांना सादर करण्यात आला आहे. आपणाकडून चौकशी आणि पंचनाम्यासाठी कोणताही विलंब करण्यात आला नाही.
- वैशाली गवळी
तलाठी, बोरजवळा, ता. खामगाव.
तलावातून गौण खनिजाची चोरी होत असल्याचे तात्काळ तहसीलदारांच्या निदर्शनास आणून दिले. मात्र, महसूल स्तरावरून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. मंडळ अधिकारी घटनास्थळी पोहोचले देखील नाहीत. मंडळ अधिकारी वेळेवर हजर झाले असते तर, गौण खनिजाची रंगेहात चोरी पकडल्या गेली असती.
- कल्याणसिंह तोमर
तक्रारकर्ता, बोरजवळा ता. खामगाव.