बुलडाणा जिल्ह्यात 'सारी'चे दीड हजार रुग्ण; ७५ टक्के सर्वेक्षण पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2020 11:56 AM2020-10-05T11:56:20+5:302020-10-05T11:56:55+5:30
Buldhana News तब्बल १,५८९ रुग्ण आढळून आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ अभियानातंर्गत जिल्ह्यात १९ लाख ९७ हजार ५५५ व्यक्तींचे सर्वेक्षण पुर्ण करण्यात आले असून या मध्ये सारी अर्थात सिव्हीयर अॅक्टुट रेस्पीरेटरी इनफ्केशन (सारी) आणि इन्फ्युएनजा लाईक इन्फेक्शनचे (आयएलएम) तब्बल १,५८९ रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान कोरोना सदृश्य लक्षणे किंवा दुर्धर आजार असलेल्या १,३५६ संदिग्धांना आतापर्यंत फिव्हर क्लिनीकमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
जिल्ह्यात १५ सप्टेंबर पासून या अभियानास प्रारंभ झाला असून तीन आॅक्टोबर पर्यंत जिल्ह्यातील ७५ टक्के नागरिकांचे सर्वेक्षण पुर्ण झाले आहे. या दरम्यान २,९४५ व्यक्ती या संदिग्ध रुग्ण म्हणून समोर आल्या आहेत. पैकी आशा वर्क र्सनी १,३५६ संदिग्ध रुग्णांना प्रथमत: फिव्हर क्लिनीकमध्ये उपचारासाठी पाठवीले व तेथून कोरोना संसर्गाची लक्षणे असलेल्यांना पुढील उपचाासाठी डेडीकेटेड हॉस्पीटलमध्ये पाठविण्यात आले असल्याची माहिती आहे. प्रामुख्याने ज्यांच्या शरीरात आॅक्सीजनचे प्रमाण कमी, ताप आणि दुर्धर आजार यापैकी दोन लक्षणे आढळून आलेल्यांना पुढील उपचाराठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. १८ दिवसात जिल्ह्यातील २६ लाख ६० हजार ८९७ नागरिकांपैकी प्रत्यक्ष १९ लाख ९७ हजार ५५५ व्यक्तींना गठीत करण्यात आलेल्या १,७१८ पथकांनी भेटी देवून त्यांची आरोग्य विषयक माहिती संकलीत करत त्यांना आरोग्य शिक्षण दिले. त्यामुळे तुर्तास तरी ही मोहिम जिल्ह्यात योग्य दिशेने जात असल्याचे एकंदरीत चित्र आहे.
अद्यापही सहा लाख ६३ हजार ३४२ नागरिकांचे सर्वेक्षण होणे अद्यापही बाकी आहे. जवळपास जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येपैकी २४.९१ टक्के लोकसंख्येची आरोग्य तपासणी राहली आहे. दरम्यान, चार आॅक्टोबर रोजीही काही जणांची तपासणी झाली आहे. बुलडाणा शहरात या मोहिमेअंतर्गत वेग वाढविण्याची गरज आहे. बुलडाणा शहरात संथ गतीने हे सर्वेक्षण सुरू आहे. सोबतच मोहिमेची अॅपमध्ये माहिती भरण्याचा वेगही मंद आहे.
चार लाख घरांमध्ये आरोग्य शिक्षण
या मोहिमेतंर्गत १,७१८ पथकातील सदस्यांनी ४ लाख ७३ हजार १९२ घरांना भेट दिली असून कुटुंब प्रमुखासह कुटुंबातील व्यक्तींना आरोग्य विषयक माहिती व प्रशिक्षणही दिले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास ७५ टक्के नागरिकांना कोरोना संदर्भाने बचाव कसा करावा, याची सविस्तर माहिती देण्यात यंत्रणेला बऱ्यापैकी यश आले आहे. दरम्यान सरासरी ५० घरांना ही पथके दररोज भेटी देत असून माहिती संकलीत करती आहेत. या मोहिमेची पहिल्या टप्प्याची समाप्ती ही दहा आॅक्टोबर रोजी होत आहे. मोहिमेचा दुसरा टप्पा १४ आॅक्टोबर ते २४ आॅक्टोबर दरम्यान राबविण्यात येणार आहे.