लाखनवाडा परिसरात दीड हजार मेंढ्या दगावल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 02:51 PM2019-11-04T14:51:46+5:302019-11-04T14:51:52+5:30
१२० कुटुंबातील प्रत्येकाच्या १५ ते २० मेंढ्या दगावल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनवाडा : अतिवृष्टीमुळे लाखनवाडा परिसरात १५०० पेक्षा जास्त मेंढ्या मृत्यूमुखी पडल्या आहेत. त्यामुळे मेंढपाळांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आमदार अॅड. आकाश फुंडकर यांनी मेंढपाळांच्या वस्तीत जावून पाहणी केली.
लाखनवाडा येथे मेंढपाळांचे अनेक कुटुंब आहेत. त्यापैकी जवळपास १२० कुटुंबातील प्रत्येकाच्या १५ ते २० मेंढ्या दगावल्या आहेत. गेल्या अनेक महिन्यापासून अज्ञात आजाराच्या साथीत दररोज काही मेंढ्या दगावत होत्या. मेंढपाळांनी हजारो रुपये खर्च करुन मेंढ्यावर खाजगी औषधोपचार केलेत परंतु सदर आजाराची साथ आटोक्यात आली नाही. अखेर मेंढ्या अशक्त झाल्या त्यातच गेल्या दोन तीन दिवसापासून लाखनवाडा परिसरात अतिवृष्टी होत असल्यामुळे अखेर मेंढ्या दगावण्याची संख्या झपाट्याने वाढली. दोन दिवसात अतिवृष्टीमुळे हजारो मेंढ्या दगावल्या आहेत.
अतिवृष्टीमुळे जवळपास १२० मेंढपाळ कुटुंबाच्या १५०० ते २००० मेंढ्या दगावल्यामुळे मेंढपाळांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना भेटणार आहोत.
- डॉ.संतोष हटकर
लाखनवाडा
दगावलेल्या मेंढ्यांचे पंचनामे करणे सुरु असून आतापर्यंत किती मेंढ्या दगावल्या याचा निश्चित आकडा सांगता येत नाही. दगावलेल्या सर्व मेंढ्यांचे पंचनामे झाल्यानंतर दगावलेल्या मेंढ्यांचा आकडा समोर येईल.
- डॉ.राजेश अवताडे
पशूधन विकास अधिकारी