पत्नीच्या खूनप्रकरणी एकास जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 02:20 PM2019-03-17T14:20:27+5:302019-03-17T14:22:43+5:30
बुलडाणा : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा खून केल्याप्रकरणी पतीस जन्मठेप व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायालयाने १६ मार्च रोजी हा निकाल दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा खून केल्याप्रकरणी पतीस जन्मठेप व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायालयाने १६ मार्च रोजी हा निकाल दिला.
तालुक्यातील खुपगाव येथील नीलेश उर्फ समाधान गायकवाड हा पत्नी यशोदाच्या चारित्र्यावर सतत संशय घेत असे. त्यामुळे त्यांच्यात नेहमी खटके उडत होते. दरम्यान १९ सप्टेंबर २०१७ रोजी दुपारी याच कारणावरुन पती- पत्नीमध्ये भांडण झाले. त्यामुळे नीलेशने पत्नीस लोखंडी पाईपने मारहाण करुन घटनास्थळावरुन पळ काढला. डोक्याला मार लागल्याने यशोदा गंभीर जखमी झाली. शेजाऱ्यांनी जखमीस येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. प्रथमोपचार केल्यानंतर तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला अकोला हलविण्यात आले. मात्र रस्त्यातच यशोदाचा मृत्यू झाला.
खुपगावचे पोलिस पोटील विदूर तुपकर यांनी या घटनेची तक्रार बुलडाणा ग्रामिण पोलिस ठाण्याला दिली होती. तत्कालीन ठाणेदार अमित वानखेडे यांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन न्यायालयात या प्रकरणी दोषारोपपत्र दाखल केले होते. वादी पक्षाच्यावतीने वतीने प्रकरणात एकूण दहा साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये दोन प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची साक्ष ग्राह्य धरुन जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी आरोपीस जन्मठेप व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. प्रकरणात जिल्हा सरकारी वकिल अॅड. व्ही. एस. भटकर यांनी वादी पक्षाची बाजू मांडली. न्यायालयीन कामकाजासाठी रुपचंद इंगळे यांनी सहकार्य केले.
(प्रतिनिधी)