एक किलो मिठाची थैली १३ हजार ५११, तर १०० ग्रॅम हळद ३ हजार ७०० रुपयांना
By ब्रह्मानंद जाधव | Published: September 29, 2023 06:47 PM2023-09-29T18:47:31+5:302023-09-29T18:47:59+5:30
एक किलो मिठाची थैली १३ हजार ५११ रुपये, तर १०० ग्रॅम हळद ३ हजार ७०० रुपयांना विक्री झाली आहे.
नायगांव दत्तापूर : ऐकून नवल वाटेल, पण एक किलो मिठाची थैली १३ हजार ५११ रुपये, तर १०० ग्रॅम हळद ३ हजार ७०० रुपयांना विक्री झाली आहे. गणेश उत्सवाला झालेल्या भंडाऱ्यातील उरलेल्या धान्याची हर्राशी करण्याची ही परंपरा मेहकर तालुक्यात नायगाव दत्तापूर येथील मंदिरात जपली जात आहे.
येथील हनुमान मंदिर मंदिरात दरवर्षी आषाढी एकादशीला एक महिना पोथी पारायण सुरू असते. त्याचठिकाणी गणेशाची स्थापना व विसर्जनावेळी अमृत योग म्हणुन सर्व गावकऱ्यांतुन गहु, तांदुळ, तूर दाळ आणि वर्गणी जमा करत संपूर्ण गावाचा १० क्विंटलचा भंडारा येथे होतो. हीच परंपरा यंदाही जपण्यात आली आहे. १७१ वर्षाची परंपरा आजही जोपासत पोथी पारायणाची सांगता टाळ व मृदंगाच्या गजरात करण्यात आली. संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली. २८ सप्टेंबर रोजी १० क्विंटलचा भंडारा सर्व गावकऱ्यांच्या सहभातून पार पडला. त्यानंतर २९ सप्टेंंबरला उरलेल्या धान्याची सर्व गावकऱ्यांच्या उपस्थितीत हर्राशी पार पडली. मंदिराचे भंडाऱ्यातील उरलेले धान्य बाजार भावापेक्षा दहा पटीने जास्त दरात विकत घेण्यासाठी ग्रामस्थांमध्ये चढा-ओढ होताना पाहावयास मिळत आहे. एकुण ८५ हजार ३३३ रुपयांची धान्य व किराणा साहित्याची भाविकांनी मोठ्या आनंदाने खरेदी केली.
धान्य घेण्यासाठी अशी लागली बोली
भास्कर दशरथ निकम यांनी सात किलो तुर दाळ २३ हजार २५० रुपये, विठ्ठल भिकाजी निकम एक किलो मिठ १३ हजार ५११, सज्जन दहातोंडे यांनी १०० ग्रॅम हळद ३ हजार ७००, सुनील निकम पावडर १०० ग्राम २५००, गजानन निकम गहु आटा २० किलो १० हजार, आटा गणेश शेळके ३४८०, प्रत्येकी ५० किलो गहु भारत निंबेकर ३०००, शिवाजी नालेगांवकर २५५०,नामदेव खाडे २०००, तुकाराम साळूंके १९००,धोंडु शेळके १६५०, सुधाकर शेळके १६५०, सुरेश शेळके २१०, मिठ थैली १ किलो डॉ.समाधान निकम ३७००, शिवाजी शेळके ३५००, साडी सुधाकर निकम ५६५६, साडी ईश्वर प्रल्हाद निकम २५२५, तांदूळ विजय चिपडे ४०० आणि सर्व धान्याची खाली पडलेली झाड-झुड ५०० ग्राम पुरुषोत्तम भाकडे १५१ रूपयात खरेदी केली.