चार वाहनांच्या विचित्र अपघातात एक जण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 10:02 PM2021-02-18T22:02:03+5:302021-02-18T22:02:51+5:30
Accident News ही घटना खामगाव-चिखली रस्त्यावरील माथनी फाट्यावर रात्री ८:३० वाजता दरम्यान घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: गावातील पोच रस्त्यावरून भरधाव महामार्गावर अचानक आलेल्या वाहनामुळे चार वाहनांचा विचित्र अपघात झाला. यात एक जण जागीच ठार झाला. ही घटना खामगाव-चिखली रस्त्यावरील माथनी फाट्यावर रात्री ८:३० वाजता दरम्यान घडली.
माथनी फाट्यावरील अंतर्गत रस्त्यावर एक मालवाहू वाहन भरधाव वेगात अचानक मुख्य रस्त्यावर आले. अचानक आलेल्या वाहनामुळे चिखलीकडे जाणारी बस या वाहनावर आदळली. त्यापाठोपाठ आणखी एक प्रवासी जीपगाडी आणि आॅटोही समोरील वाहनांवर धडकला. यात मालवाहू मिनीट्रक वाहनांतील एक २० वर्षीय युवक जागीच ठार झाला. तर उर्वरीत वाहनांमधील सुमारे सात जण जखमी झालेत. यातील दोन जखमींना तात्काळ अकोला येथे हलविण्यात आले असून, सहा जणांवर खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातील काही जखमी परस्पर खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. त्यामुळे या उपघातातील जखमींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या घटनेत सिंदखेड राजा तालुक्यातील लिंगा येथील गजानन विश्वनाथ गाढवे(२०) या युवकाचा घटनास्थळीच दुर्देवी मृत्यू झाला. तर विजय रायसिंग पवार(४०) रा. पातुर्डा, सुनिल नागोराव डोंगरे (३६) रा.बोरगाव वैराळे, पुरूषोत्तम भास्कर चेके (५०) रा. लिंगा, बापुराव महादेव मानवतकर (५५) रा. लिंगा, देवानंद रामदास चेके (१५) रा.लिंगा, ज्ञानेश्वर सदाशिव चेके (३०) रा.लिंगा, चेविन विश्वनाथ पवार (२८) दधम, सविता विनोद इंगळे (१८) रा. बुलडाणा जखमी झालेत. यातील दोन गंभीर जखमींना तात्काळ अकोला येथे हलविण्यात आले. त्याचवेळी संगीता इंगळे, विश्वनाथ चेके, कविता देशमुख, अर्जुन देशमुख, सुनिल डाबर, भावना देशमुख, प्रशांत भालेराव, डिगांबर चेके, महादेव धनोकार, रतन चव्हाण आदी किरकोळ जखमी झाल्याने त्यांना प्राथमिक उपचारानंतर सुटी देण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस स्टेशनचे पथक आणि शहर पोलिस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
-शेतकºयांवर काळाचा घाला!
गुरूवारी खामगावचा बाजार असल्यामुळे लिंगा येथील काही शेतकरी खामगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी आले होते. शेतमाल विक्री केल्यानंतर परत गावी परतत असतानाच माथनी फाट्यावर अपघात झाल्याचे समजते. यात एका युवा शेतकºयाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.