रानडुकराची दुचाकीला धडक; एक जण ठार; एक गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 12:20 PM2020-03-18T12:20:29+5:302020-03-18T12:20:37+5:30
सुधाकर पांडुरंग जाधव व राजरत्न लक्ष्मण गवई हे दोघे सोमवारी रात्री दुचाकीने मलकापुरवरुन गावी परत येत होते.
धामणगाव बढे : रानडुकराने दुचाकीला धडक दिल्याने एक जण ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना धामणगाव बढे ते पिंपळगाव देवी रस्त्यावर सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली.
धामणगाव बढे येथील सुधाकर पांडुरंग जाधव व राजरत्न लक्ष्मण गवई हे दोघे सोमवारी रात्री दुचाकीने मलकापुरवरुन गावी परत येत होते. दरम्यान, रात्री १० वाजेच्या सुमारास रानडुकराने दुचाकीला धडक दिली. धामणगाव बढेपासून २ किलोमिटर अंतरावर ही घटना घडली.
यामध्ये सुधाकर जाधव यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना धामणगाव बढे आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला तर राजरत्न गवई हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे.
मृतदेह शवविच्छेदनासाठी बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आला. मृताच्या पश्चात पत्नी, २ मुली, मुलगा, आई-वडील असा आप्त परिवार आहे. सुधाकर जाधव यांच्या मृत्युने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, धामनगाव बढे तथा नळगंगा धरणाच्या परिसरामध्ये रानडुकरांची संख्या अधिक आहे. या भागात गेल्या दोन वर्षापूर्वी रानडुकराने हल्ला केल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटनाही घडली होती. नळगंगा धरणालगत ती घडली होती.
(वार्ताहर)