बुलडाणा जिल्ह्यातील १ लाख ८० हजार शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 07:06 PM2017-12-12T19:06:32+5:302017-12-12T19:14:43+5:30
आॅनलाईन अर्ज प्रक्रियेनंतर प्राप्त याद्यांची छाननी करून बनविण्यात आलेल्या ग्रीन याद्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील २ लाख २२ हजार ३०९ शेतकरी पात्र ठरले असून, यातील १ लाख ८० हजार शेतकर्यांना सरसकट दीड लाखापर्यंतची कर्जमाफी देण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अर्थातच ऐतिहासिक कर्जमाफी योजनेतंर्गत जिल्ह्यातील दोन लाख २२ हजार ३०९ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. आॅनलाईन अर्ज प्रक्रियेनंतर प्राप्त याद्यांची छाननी करून बनविण्यात आलेल्या ग्रीन याद्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील दोन लाख २२ हजार ३०९ शेतकरी पात्र ठरले असून यातील एक लाख ८० हजार शेतकर्यांना सरसकट दीड लाखापर्यंतची कर्जमाफी देण्यात आली आहे.
सोबतच (ओटीएस) एकरकमी योजनेतंर्गत ४१ हजार ५१८ शेतकर्यांना कर्जमाफी मिळाली आहे. अशाप्रकारे एकरकमी व सरसकट कर्जमाफीचा विचार करता जिल्ह्यातील दोन लाख २२ हजार ३०९ शेतकरी कर्ज माफीसाठी पात्र ठरले आहे. यासाबेतच जिल्ह्यात प्रोत्साहनपर अनुदानही देण्यात आले असल्याची माहिती सुत्रांनी दिली. या योजनेतंर्गत राज्यात साधारणत: ४१ लाख शेतकर्यांच्या कर्जमाफीसाठी १९ हजार कोटी रुपयांची रक्कम बँकांकडे वर्ग करण्यात आली आहे.
कर्जमाफीसाठी ७७ लाख अर्ज राज्यभरातून प्राप्त झाले होते. छाननी करण्यात आल्यानंतर डुप्लिकेशन झालेले खाते दूर करुन ६९ लाख खात्यांवर कर्जमाफीची रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यापैकी जवळपास ४१ लाख खात्यांमध्ये कर्जमाफीचे अनुदान देण्यासाठी राज्य शासनाकडून बँकांकडे १९ हजार कोटी रुपयांचा निधी हस्तांतरीत करण्यात आला आहे. दरम्यान, शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने शेतजमिनीची अट न ठेवता कर्जमाफी योजना जाहीर केली आहे.
बुलडाणा तालुक्यातील रुईखेड टेकाळचे नारायण देशमुख या अल्पभूधारक शेतकर्याचे जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचे १७ हजार २०० रुपयांचे थकीत कर्ज माफ करण्यात आले आहे. तसा एसएमएसही त्यांना आला आहे. भादोला येथील अनिल भालेराव यांचेही सहकारी बँकेचे ७७ हजार रुयांचे कर्जमाफ झाले आहे. दरम्यान, रुईखेड येथील श्रीधर टेकाळे यांचेही एक लाख २० हजार २४३ रुपयांचे थकीत कर्ज होते. तेही या प्रक्रियेत माफ करण्यात आले आहे. इसापूर येथील शेतकर्याचेही कर्ज माफ झाले आहे.