बुलडाणा जिल्ह्यातील एक लाख बालकांचा हिरावल्या जातोय पोषण आहार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 11:08 AM2021-03-04T11:08:48+5:302021-03-04T11:08:54+5:30
Buldhana News ९७ हजार ४४३ अंगणवाडीतील बालके गत दीड महिन्यांपासून पोषण आहारापासून वंचित असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : बुलडाणा जिल्ह्यातील तब्बल ९७ हजार ४४३ अंगणवाडीतील बालके गत दीड महिन्यांपासून पोषण आहारापासून वंचित असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. याप्रकरणी पालकमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविण्यात येत असल्याचे समोर येत आहे, हे येथे उल्लेखनिय!
बुलडाणा जिल्ह्यातील सर्वच १३ तालुक्यांमध्ये असलेल्या अंगणवाडीतील ०३ ते ०६ वर्ष वयोगटातील लाभार्थी यांना टीएचआर स्वरूपात घरपोच आहार वाटप करण्यासाठी बुलडाणा जिल्हापरिषद प्रशासनाने महाराष्ट्र राज्य स्टेट को. ऑफ कन्झ्युमर्स फेडरेशन लि. मुंबई यांना १५ जानेवारी रोजी पुरवठा आदेश दिला आहे.
गहू, तांदूळ, मसूर डाळ, चना, मिरची, हळद, मिठ, सोयाबीन तेल अशा कच्च्या धान्याचे किट वितरीत करण्यासाठी जिल्ह्यातील कोणत्याही अंगणवाडीत पुरवठा न झाल्यामुळे पोषण आहार लाभार्थी आहारापासून वंचित राहत आहेत. मात्र, याकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आता या प्रश्नी जिल्हा प्रशासन नेमकी कोणती भुमिका घेते याकडे लक्ष लागून राहलेले आहे. घडलेला प्रकार हा गंभीर असून पालकमंत्री याप्रकरणी दोषींवर कोणती कारवाई करतात याकडे लक्ष लागून आहे.
दीड महिन्यांपासून आहाराचा पुरवठाच नाही!
माहे १६ फेब्रुवारी ते १५ एप्रिल २०२१ या दोन महिन्यांच्या कालाधीत बालकांना कच्चे धान्य आणि किराणा माल पोहोचविण्याचे पुरवठा आदेश असतानाही मार्च महिन्यांपर्यंतही जिल्ह्यातील अनेक अंगणवाडीमध्ये पोषण आहार वितरीत केला गेला नाही.
त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच १३ तालुक्यांमधील ९७ हजार ४४३ बालकांचा पोषण आहार जिल्हा प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे हिरावला जात असल्याचे दिसून येते. पालकमंत्र्यांच्या आदेशावर चौकशी न करताच पुरवठ्याचे आदेश दिल्याचे दिसून येते.
बुलडाणा तालुक्यातील काही तालुक्यातील अंगणवाडीमध्ये पोषण आहाराचा पुरवठा सुरू झाला आहे. काही तालुके अद्यापही बाकी आहेत.
- गजानन शिंदे
बाल विकास प्रकल्प अधिकारी, बुलडाणा
खामगाव तालुक्यात ०२ मार्चपर्यंत पोषण आहाराचा पुरवठा करण्यात आलेला नव्हता. पुरवठ्याबाबत चौकशी करून निश्चित सांगता येईल.
- राजेश वाघ
बाल विकास प्रकल्प अधिकारी, खामगाव.