मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये दिले एक महिन्याचे निवृत्तीवेतन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:36 AM2021-05-11T04:36:56+5:302021-05-11T04:36:56+5:30
बुलडाणा : कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनाच्या या संकट काळात आरोग्य सेवेला हातभार लागावा यासाठी माजी राज्यमंत्री ...
बुलडाणा : कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनाच्या या संकट काळात आरोग्य सेवेला हातभार लागावा यासाठी माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी त्यांचे विधानसभा सदस्यपदाचे एक महिन्याचे निवृत्तीवेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये दिले आहे.
राज्यातील वेतनधारक व निवृत्तीवेतनधारकांनाही आपले एक महिन्याचे वेतन आरोग्य सेवेसाठी देण्याचे आवाहन सावजी यांनी केले आहे. माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांच्या एक महिन्याच्या मानधनाचा ७० हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरिता जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, माजी आमदार तथा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल बोंद्रे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते साहेबराव सरदार, जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष शैलेश सावजी उपस्थित होते. राज्यातील सर्व वेतनधारक व निवृत्तीवेतनधारकांना त्यांनी आपले एक महिन्याचे वेतन देण्याची विनंती केली आहे. राज्यामध्ये गेल्या दीड वर्षापासून कोरोनाने थैमान घातले आहे. यामध्ये शासन आपल्यापरीने प्रयत्न करत आहे. परंतु, निधीअभावी शासनाचे प्रयत्न तोकडे पडत आहेत. याकरिता ज्यांचे वेतन व निवृत्तीवेतन ४५ हजार रुपयांच्यावर आहे, अशा सर्व वेतन व निवृत्तीवेतनधारकांनी आपल्याला मिळणारी एक महिन्याची पूर्ण रक्कम स्वखुशीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करावी, जेणेकरुन शासनाला याचा फार मोठा हातभार लागेल, असे आवाहनही एका पत्राद्वारे सुबोध सावजी यांनी केले आहे. राज्यातील बिकट परिस्थितीत एक महिन्याचे वेतन व निवृत्तीवेतन दिल्याने मिळकतीत फार परिणाम होत नाही. त्यामुळे प्रत्येकाने यासाठी पुढाकार घ्यावा, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.