"स्वाईन फ्लू" ने एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2017 08:09 PM2017-06-01T20:09:19+5:302017-06-01T20:09:19+5:30
लोणार : स्वाइन फ्लू या प्राणघातक आजाराने तालुक्यातील रायगाव येथील काशिनाथ नामदेव नागरे (वय ५२ वर्षे) यांचा औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात ३१ मे रोजी मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणार : स्वाइन फ्लू या प्राणघातक आजाराने तालुक्यातील रायगाव येथील काशिनाथ नामदेव नागरे (वय ५२ वर्षे) यांचा औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना ३१ मे रोजी मृत्यू झाला. काशिनाथ नामदेव नागरे आजारी असल्यामुळे त्यांना प्रथम लोणार येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु आजार दुरूस्त न झाल्यामुळे त्यांना मेहकर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नागरे यांच्या प्रकृतीत काहीही सुधारणा होत नसल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरु असताना नागरे यांचा मृत्यू झाला. त्यांना स्वाईन फ्ल्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत माहिती मिळताच तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अनंत पबितवार, वैद्यकीय अधिकारी डॉ.मंगेश सानप व त्यांची चमू गावात पोहचली. त्यांनी घरोघरी जाऊन प्रत्येकाची तपासणी केली असता कोणीही तापाने व संशयित आढळून आले नाही. यामुळे त्यांनी माहिती घेतली असता मृतक काशिनाथ नागरे यांना प्रवासादरम्यान स्वाईन फ्ल्यू ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. खबरदारी म्हणून आरोग्य विभागाची चमू रायगाव येथे तळ ठोकून असल्याचे डॉ. अनंत पबितवार यांनी सांगितले.
रायगाव येथे आम्ही सकाळीच जाऊन भेट देऊन गावाची पाहणी करत ग्रामस्थांची तपासणी मोहीम राबविली आहे. तरी घरात कोणी आजारी असल्यास त्वरित रुग्णालयात दाखवून उपचार घ्यावेत.
- डॉ.अनंत पबितवार, तालुका आरोग्य अधिकारी.