लॉकडाऊन काळात एक हजार गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 10:57 AM2020-06-09T10:57:18+5:302020-06-09T10:57:26+5:30
लॉकडाऊन दरम्यान जिल्ह्यात तब्बल एक हजार ३८ गुन्हे दाखल झाले आहे.
बुलडाणा : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान जिल्ह्यात तब्बल एक हजार ३८ गुन्हे दाखल झाले आहे.
एकीकडे कोरोना संसर्गाशी दोन हात करत जमिनस्तरावर काम करणाऱ्या पोलिसांना कायदा व सुव्यवस्था सांभाळावी लागत होती. त्याच लॉकडाऊनच्या काळात जिल्यात हे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल झाले आहेत, हे विशेष. दरमयान, दुहेरी कर्तव्याची भूमिका बजावत पोलिसांनी अशा दाखल प्रकरणांमध्ये ५४ जणांना अटकही केली होती. बुलडाणा शहरात जवळपास ८० क्विंटल गांजा जप्त करण्याचे प्रकरणही याच कालावधीत झाले होते. तेही पोलिस प्रशासनाने योग्य पद्धतीने हाताळले आहे. दुसरीकडे लॉकडाऊनच्या नियमांचा भंग करणे व तत्सम कारणांनी जवळपास १७ वाहनेही जप्त करण्यात आली असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
परिणामी गेल्या अडीच महिन्यात पोलिसांना कायदा व सुव्यस्था राखण्यासोबतच कोरोना संसर्गापासून बचावासाठीही लढावे लागत असल्याचे चित्र जिल्ह्यात निर्माण झाले होते. रेतीची अवैध वाहतूक करणाºया वाहनांवरही पोलिस प्रशासनाने या कालावधीत कारवाई केली आहे. महसूल विभागाच्या सहकार्याने यासाठी विशेष मोहिमच पोलिस प्रशासनाने राबवली होती. देऊळगावराजा, संग्रामपूर, जळगाव जामोद, नांदुरा, मलकापूर तालुक्यात प्रामुख्याने संयुक्त मोहिम राबवून रेतीचा अवैध साठा जप्त केला आहे.
मोटार वाहन कायदा भंग; २७ हजार गुन्हे दाखल
लॉकडाऊनच्या कालावधीत संचारबंदीसह मोटार वाहन कायदा १९८० मधील विविध कलमांचा वापर करत जिल्ह्यात तब्बल २७ हजार ३७३ गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. या मध्ये ५२ लाख ३७ हजार ५०० रुपयांचा दंडही पोलिस प्रशासनाने वसूल केला असल्याची माहिती महसूल विभागातील एका अधिकाºयाने ‘लोकमत’शी बोलतांना दिली.