शाळाबाह्य मुले शोधण्यासाठी 'एक गाव एक बालरक्षक'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 12:14 PM2020-08-29T12:14:57+5:302020-08-29T12:15:15+5:30
स्थलांतरीत होणाऱ्या बालकांना शाळांत दाखल करण्यासाठी शिक्षण विभागाने गाव तेथे बालरक्षक ही संकल्पना पुढे आणली आहे.
खामगाव : कुणीही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी लॉकडाऊनच्या काळात स्थलांतरीत होणाऱ्या बालकांना शाळांत दाखल करण्यासाठी शिक्षण विभागाने गाव तेथे बालरक्षक ही संकल्पना पुढे आणली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावात बालरक्षक नेमण्यात येत आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने उपक्रम सुरू केला आहे.
कोरोना संसर्गाच्या काळात राज्यातील विविध जिल्ह्यातून व बाहेरच्या राज्यातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लोक परतले आहेत. त्यांच्यासोबत असलेली ६ ते १४ वर्षे वयोगटातील बालके शाळाबाह्य असण्याची शक्यता आहे. प्रत्येक मुल शाळेत गेलेच पाहिजे, यासाठी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी ३ आॅगस्ट रोजी संवाद साधून राज्यातील बालरक्षक चळवळीतील समोरील आव्हाने, पुढील दिशा या विषयावर मार्गदर्शन केले. सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुभार्वामुळे कुटुंबे स्थलांतरीत होत आहेत. त्यामध्ये इतर जिल्ह्यातून राज्यातून येणारे व जिल्ह्यातून दुसरा जिल्ह्यात व दुसºया राज्यात जाणारे कुटुंब आहेत. या कुटुंबासोबत ६ ते १४ वर्षे वयोगटातील बालके सुद्धा आहेत. ही बालके शाळाबाह्य तर नाही ना, याचा शोध शिक्षण विभाग घेत आहे. शिक्षण आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेचा शिक्षण विभागाकडून कार्यवाही केली जाणार आहे. प्रत्येक शिक्षक बालरक्षक आहे. प्रत्येकाने प्रभावी अंमलबजावणीकरीता प्रत्येक शाळेत, प्रत्येक गावात एक बालक रक्षक नेमावा अशा सूचना आहेत.
प्रत्येक गावात बालरक्षकाची नियुक्ती
निस्वार्थपणे बालरक्षक म्हणून काम करण्याची तळमळ आहे, त्यांना बालरक्षक म्हणून नेमावे. बालरक्षक कुणालाही बनविता येऊ शकते. बालरक्षकांवर संपूर्ण गावातील शाळाबाह्य बालकांची जबाबदारी राहील. आवश्यकतेनुसार बालरक्षक शिक्षकांचे सहकार्य घेतील. बालरक्षकाचे नाव शाळेच्या दर्शनी भागावर व ग्रामपंचायतच्या दर्शनी भागावर लावावे असेही सांगण्यात आले आहे. बालकांचे पोषण, रक्षण व शिक्षण या तीन गोष्टींवर बालरक्षकांनी काम करावे असेही ठरविण्यात आले आहे.
स्थलांतर थांबवण्यासाठी प्रयत्न
विद्यार्थ्यांची शारीरिक व मानसिक आरोग्य, भाविनक व सामाजिक संतुलन, मूलभूत क्षमता या बाबींवर बालरक्षकांनी लक्ष द्यावे, सध्या आॅनलाइन शिक्षण सुरु आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे टीव्ही, कम्प्युटर, मोबाईल नाही त्यांच्यापर्यंत शिक्षकांच्या सहकार्याने बालरक्षकांनी पोहोचावे. स्थलांतरामुळे मुलांच्या शाळा बदलतात, त्यामुळे स्थलांतर थांबविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे, असेही सांगण्यात आले आहे.