युवतीचा विनयभंग करणाऱ्यास एक वर्ष सश्रम कारावास अन् दंडाची शिक्षा
By अनिल गवई | Published: April 17, 2023 01:34 PM2023-04-17T13:34:57+5:302023-04-17T13:35:13+5:30
युवतीने आरडाओरड केल्याने आजूबाजूचे लोक त्या ठिकाणी गोळा झाले.
खामगाव: महाविद्यालयातून घरी जात असणाऱ्या युवतीला अडवून व तिचा हात धरून विनयभंग करणाऱ्या युवकाला सत्र न्यायालयाने एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व दंडाची शिक्षा ठोठावली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, १० मार्च २०१५ रोजी एक विद्यार्थिनी महाविद्यालयातून घरी जात असताना रस्त्यात आरोपी विकी दादाराव वानखेडे याने विनयभंग केला. युवतीने आरडाओरड केल्याने आजूबाजूचे लोक त्या ठिकाणी गोळा झाले. त्यामुळे आरोपी पळून गेला. या घटने पूर्वी देखील आरोपीने असाच प्रकार केला होता. वारंवार आरोपीकडून होणाऱ्या अशा छेडछाडीमुळे संतापलेल्या युवतीने न घाबरता पोलीस स्टेशन जलंब येथे फिर्याद नोंदवली.
न्यायालयात देखील न घाबरता संपूर्ण घटनाक्रम पुराव्याद्वारे सांगितला. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील वसंत भटकर यांनी आठ साक्षीदारांचे पुरावे न्यायालयासमोर नोंदवले. सरकार पक्षाच्या सर्व साक्षीदारांचा पुरावा तसेच सरकारी वकिलांचा युक्तिवाद विचारात घेऊन न्यायालयाने उपरोक्त शिक्षा ठोठावली. याप्रकरणी तपासी अंमलदार जयपाल ठाकूर यांनी दोषारोप पत्र दाखल केले. पैरवी अधिकारी म्हणून पोहेकॉ चंद्रलेखा िशंदे यांनी काम पाहीले.