‘ऑनलाइन अंगणवाडी’ प्रक्रिया खोळंबली!
By Admin | Published: September 20, 2015 11:19 PM2015-09-20T23:19:36+5:302015-09-20T23:19:36+5:30
स्वत:ची इमारत आणि वीजपुरवठय़ाचा अभाव.
बुलडाणा : शासनातर्फे महिला आणि बाल विकास विभागाकडून चालविल्या जाणार्या जिल्ह्यातील सर्वच अंगणवाड्या हायटेक करण्याची तयारी सुरू आहे. याद्वारे अंगणवाड्यांमधील सर्वच कार्यप्रणाली ऑनलाइन केली जाणार आहे; मात्र बर्याच अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत व मुख्यत: वीजपुरवठा नसल्याने ऑनलाइन अंगणवाडीची ही प्रक्रिया खोळंबली आहे. जिल्ह्यातील जवळपास सर्व प्रशासकीय विभागांचे कामकाज ऑनलाइन झाले आहे. आता शासनाकडून जिल्ह्यातील अंगणवाड्यांचे कामकाज ऑनलाइन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यातील एकूण २७११ अंगणवाड्यांसाठी ५ हजार ४२२ कर्मचारी कार्यरत आहेत; मात्र यापैकी केवळ ९९२ अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत आहे, तर २0१४-१५ मध्ये जिल्ह्यात १३१ अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत बांधण्याची परवानगी देण्यात आली आहे. अंगणवाड्यांमार्फत विविध आरोग्य सुविधांची माहिती, कुपोषण, गर्भवती महिला आणि लहान बालकांना लसीकरणाची माहिती दिली जाते; मात्र आजही जवळपास १५00 पेक्षा जास्त अंगणवाड्यांना स्वत:च्या मालकीच्या इमारती नाही. वीजपुरवठय़ाचा अभाव असल्याने ऑनलाइन कामकाजाची प्रक्रिया खोळंबली आहे. जिल्ह्यातील बर्याच अंगणवाड्यांच्या इमारतीमध्ये वीजपुरवठा उपलब्ध नाही. याशिवाय त्यांच्याकडे स्वत:ची इमारतही नाही. ग्रामीण भागात अंगणवाडी कर्मचार्यांना संगणकाचे ज्ञान किती आहे, हे सांगणे अवघड आहे. त्यामुळे ऑनलाइन प्रक्रिया राबविण्यास अडथळे येत असल्याचे महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर. एम. चंदन यांनी स्पष्ट केले.
*अंगणवाड्यांमध्ये विविध समस्या
जिल्ह्यातील बर्याच अंगणवाड्या विविध समस्यांच्या गराड्यात आहेत. येथील कार्यरत कर्मचार्यांना वेळेवर वेतन दिले जात नाही. यासंदर्भात अंगणवाडी कर्मचारी संघटनेकडून बरेचदा आंदोलनही करण्यात आले. बर्याच कर्मचार्यांना इंटरनेट वापराचे ज्ञान नसल्यामुळे अडचणी पुढे येत आहेत. याशिवाय ऑनलाइन प्रकियेसाठी आवश्यक असणारे संगणक संच, इंटरनेट व मुख्यत: वीजपुरवठा इमारतीमध्ये उपलब्ध नाही.