ऑनलाईन एज्युकेशनमुळे पालकांचा वाढला खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:42 AM2021-07-07T04:42:38+5:302021-07-07T04:42:38+5:30

गतवर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाने थैमान घातल्याने सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले होते. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दुसऱ्या लाटेत झपाट्याने वाढली ...

Online education has increased the cost of parenting | ऑनलाईन एज्युकेशनमुळे पालकांचा वाढला खर्च

ऑनलाईन एज्युकेशनमुळे पालकांचा वाढला खर्च

Next

गतवर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाने थैमान घातल्याने सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले होते. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दुसऱ्या लाटेत झपाट्याने वाढली होती. हजारो बाधितांबरोबरच शेकडोंचा मृत्यूही झाला. कोरोनामुळे मागील दीड वर्षांपासून सर्वाधिक नुकसान झाले असेल, तर ते शिक्षणाचे. शालेय विद्यार्थ्यांसह महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची शिक्षणपद्धतीच बदलून गेली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शाळा बंद ठेवून शिक्षण ऑनलाईन पद्धतीने सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मध्यंतरी कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने काही दिवस शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, कोरोनाने डोकेवर काढल्याने पुन्हा शाळा ऑनलाईन झाल्या. कला शाखा तसेच मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचा कधी तरी संगणकाशी येणारा संबंध दररोजच येऊ लागला. त्यामुळे या विद्यार्थ्यांनाही नवीन मोबाईल खरेदी करावा लागत असल्याने खिशाला झळ बसत आहे.

जिल्ह्यातील वर्गनिहाय विद्यार्थी

पहिली ४२,०११

दुसरी ४५,५७२

तिसरी ४६,३९३

चौथी ४६,९५१

पाचवी ४६,७४३

सहावी ४६,६१२

सातवी ४६५९०

आठवी ४५१०५

ऑनलाईन वर्ग असले तरी शाळेची फी पूर्ण भरावी लागतेच. त्यात इंटरनेटचा मासिक खर्च वाढला असून, नवीन मोबाईल, लॅपटॉप अथवा टॅबपैकी काही तरी हवेच, असा पाल्यांचा अट्टाहास असतो. पालक म्हणून सुविधा पुरविण्यास कमी पडणार नाही, या काळजीतून पालक साहित्य खरेदी करून द्यावेच लागते.

- सुनील काळे, पालक.

शाळांपेक्षा विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी नवीन साधनांची गरज आहे. त्यांची मागणी काळानुसार बदलत असते. जसे हेडफोन ब्लुटूथचे हवे अथवा कानाला त्रास होणार नाही, अशा गुणवत्तेचे तसेच मोबाईलसुद्धा ४ जी किंवा ५ जी हवा, अशा अपेक्षा पाल्यांच्या वाढल्या आहेत. अभ्यासाच्या कारणाने अपेक्षा पूर्ण कराव्या लागतात.

- श्याम वनारे, पालक.

मुलांचे मानसिक, शारीरिक अन् शैक्षणिक नुकसान

मोबाईल वापरामुळे मुलांचे शैक्षणिक, मानसिक आणि शारीरिक नुकसान होत आहे. शाळा बंद असल्याने मैदानी खेळ बंद असून, वाढत्या मोबाईल वापरामुळे घरातील संवाद कमी झाला आहे. त्यात युट्यूबच्या वाढत्या वापरामुळे मानसिक आरोग्य धोक्यात सापडत आहे. त्यामुळे मुलातील चिडचिडेपणा वाढत आहे. अशावेळी मुलांसोबत पालकांनी संवाद वाढवून त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे

असल्याचे मत शिक्षणतज्ज्ञांमधून व्यक्त होत आहे.

महिन्याकाठी हजार ते दीड हजारांचा खर्च

शाळांकडून नियमितपणे ऑनलाईन वर्ग घेतले जात असल्याने पालकांकडे मोबाईल, लॅपटॉप, संगणक, टॅब अशा साधनांची मागणी पाल्यांकडून होऊ लागली. अभ्यासाचे कारण असल्याने पालकांनाही हे साहित्य खरेदी करून देण्याबरोबरच इंटरनेटची सेवादेखील उपलब्ध करून द्यावी लागत आहे. पालकांच्या खिशाला मोठी कात्री बसली आहे. घरातील प्रत्येक विद्यार्थ्यास स्वत:चे साधन हवे. त्यामुळे काही पालकांचा मोबाईल, संगणकावरील खर्च एक लाखाच्या घरात गेला आहे, तर महिन्याकाठी हजार ते दीड हजार रुपयांचे इंटरनेट बिल भरावे लागत आहे.

Web Title: Online education has increased the cost of parenting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.