ऑनलाइन शिक्षण, मोबाईलने लावला मुलांना चष्मा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:26 AM2021-07-17T04:26:50+5:302021-07-17T04:26:50+5:30
जिल्ह्यात शाळा व महाविद्यालये ऑनलाईन पद्धतीनेच सुरू आहेत. यामुळे विद्यार्थी दिवसभर मोबाईलचा वापर करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. शिक्षणाबरोबर ...
जिल्ह्यात शाळा व महाविद्यालये ऑनलाईन पद्धतीनेच सुरू आहेत. यामुळे विद्यार्थी दिवसभर मोबाईलचा वापर करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. शिक्षणाबरोबर मोबाईलवर गेम खेळण्याचे प्रमाणही वाढत आहे. या सर्वांमुळे डोळ्यांचा चष्मा वाढत आहे. शाळेत जाऊन शिक्षण घेत असताना एखाद्या विद्यार्थ्यांना फळ्यावर लिहिलेले व्यवस्थित दिसत नसेल तर ते शिक्षकांच्या लक्षात यायचे. याविषयी पालकांना माहिती देऊन तत्काळ डोळ्यांची तपासणीही करून घेतली जात होती. परंतु, आता कोरोनामुळे अनेकांना डोळ्यांची तपासणीही करून घेता आलेली नाही. यामुळे जादा नंबरचा चष्मा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पालकांचीही चिंता वाढली
ऑनलाईन शिक्षणामळे मुलांच्या हातात जास्त वेळ मोबाईल द्यावा लागत आहे. यामुळे मुलांना मोबाईलचे व्यसन लागत आहे. त्यांच्या डोळ्यांवर व इतर आरोग्यावर परिणाम होत आहे. मुले घरातच बसून असल्यामुळे त्यांच्यामधील चिडचिडेपण वाढत आहे. मैदानी खेळ बंद असल्यामुळे वजनही वाढू लागले असून, पालकांना विद्यार्थ्यांच्या आरोग्याची चिंता सतावू लागली आहे.
लहान मुलांमध्येही डोकेदुखी वाढली.
१. तासन् तास मोबाईलचा वापर केल्यामुळे चष्मा लागत आहेच, याशिवाय
डोकेदुखीचा त्रासही वाढत आहे.
२. लहान मुलांना तीव्र डोकेदुखी व त्यांच्यावरील मानसिक ताणही वाढत आहे.
३. मोबाईलच्या अतिवापरामुळे आरोग्याच्या इतर समस्याही जाणवू लागल्या आहेत.
लहान मुलांना हे धोके
लवकर चष्मा लागणे व चष्याचा नंबर वाढणे.
मोबाईल वापराचे व्यसन लागणे.
डोळ्यांबरोबर आरोग्याच्या इतर समस्याही वाढत आहेत.
घरातच बसून राहावे लागत असल्यामुळे वजन वाढणे.
ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना चष्मा लवकर लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आरोग्यविषयी इतर समस्याही वाढल्या आहेत. यामुळे ऑनलाईन शिक्षणाविषयी निर्धारित वेळेचे पालन होणे गरजेचे आहे.
- डॉ. नीलेश टापरे, निवासी वैद्यकीय अधीक्षक.
डोळ्यांना त्रास होऊ नये म्हणून...
संगणक स्क्रीनवर अँटी ग्लेयर ग्लास बसवावी
अँटी ग्लेयर चष्मा वापरावा
पुस्तक १२ ते १५ इंच लांब धरावे
प्रत्येक तासिकेनंतर डोळे बंद ठेवून थोडा आराम द्यावा
पुस्तक/ संगणक उजेडात राहावा
जास्तीत जास्त फळांचे सेवन करा.