आॅनलाईन सातबारा, आठ अ मध्ये प्रचंड चुका !
By Admin | Published: June 13, 2017 07:54 PM2017-06-13T19:54:46+5:302017-06-13T19:54:46+5:30
संगणकीकृत दस्तावेज बनले डोकेदुखी
संदीप गावंडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदुरा :सद्यस्थितीत सर्व शासकीय कार्यालयांमध्ये संगणकीकरणाचे काम झालेले आहे. मात्र जुन्या दस्तावेजांचे संगणकीकरण करताना मोठ्या प्रमाणात चुका होत असून आॅनलाईन सातबारा व आठ अ मध्ये मोठे घोळ होताना दिसत आहेत. शेतकऱ्यांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज निर्माण झालेली आहे.
शासकीय कार्यालयांमध्ये परंपरागत हस्तलिखीताची पध्दत सोडून नवीन संगणकीकरणाची आॅनलाईन पध्दती स्वीकारली. सर्व सेवा अचूक, वेळेत व पारदर्शी पध्दतीने व्हाव्यात हा यामागचा उद्देश होता. परंतु जुन्या दस्तावेजांचे संगणकीकरण करताना कर्मचाऱ्यांकडून झालेल्या चुकांचा फटका आता नागरिकांना सहन करावा लागत आहे. यामध्ये प्रामख्याने सातबारा व आठ अ मध्ये मोठ्या प्रमाणात चुका झालेल्या दिसतात. क्षेत्रफळ कमी-जास्त, नावात चुका, सात-बारा योग्य असला तरी आठ अ मधील एकूण क्षेत्रफळात तफावत असणे, वर्ग १ ची जमीन वर्ग २ ची दाखविणे, जुने परतफेड केलेले कर्ज सातबारावर कायम ठेवणे अशा अनेक चुका या आॅनलाईन सातबारा व आठ अ मध्ये आढळून येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना नवीन कर्ज घेताना किंवा विविध शासकीय योजनांचा लाभ घेताना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. सदर कागदपत्रांमधील त्रुटी वेळीच दूर करण्याची गरज निर्माण झालेली आहे, एवढे मात्र खरे!