विज्ञान किटसाठी १८ जिल्ह्यात ऑनलाइन प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 10:10 PM2020-09-20T22:10:10+5:302020-09-20T22:15:01+5:30
किटद्वारे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षकांनाच प्रशिक्षणाचा कार्यक्रम २२ सप्टेंबर रोजी होत आहे.
खामगाव : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने राज्यातील १८ जिल्हा परिषदांच्या उच्च प्राथमिक शाळांना विज्ञान किटचा पुरवठा केला आहे. त्या किटद्वारे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षकांनाच प्रशिक्षणाचा कार्यक्रम २२ सप्टेंबर रोजी होत आहे. त्यामध्ये संबंधित शाळांच्या गणित व विज्ञान शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
समग्र शिक्षा अभियानांतर्गत केंद्र शासनाने एनसीइआरटीमार्फत विज्ञान किटचा पुरवठा केला आहे. उच्च प्राथमिक शाळेसाठी दिलेल्या या किटमध्ये मायक्रोस्कोपही आहे. राज्याच्या १८ जिल्हा परिषदांमध्ये ज्या शाळांना या किटचा पुरवठा झाला आहे. त्या शाळांतील शिक्षकांना आॅनलाइन प्रशिक्षण देण्याचा उपक्रम महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने आयोजित केला आहे. २२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता संबंधित शिक्षकांना ते प्रशिक्षण दिले जाणार आहे.
प्रशिक्षणात किटचा शैक्षणिक वापर कसा करावा, यासाठी आॅनलाइन वेबिनार होणार ाहे. त्यामध्ये संबंधित उच्च प्राथमिक शाळेतील गणित व विज्ञान विषयाच्या शिक्षकांना सहभागी व्हावे लागणार आहे. त्यासाठी सर्वच जिल्हा परिषदांच्या शिक्षणाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले. कार्यशाळेत सहभागी होण्यासाठीच्या सूचना पत्राद्वारे देण्यात आल्या. या किटच्या वापराचे प्रशिक्षण अहमदाबाद येथील खासगी संस्थेद्वारे दिले जात आहे.
या जिल्ह्यात झाला किट पुरवठा
केंद्र शासनाने किट पुरवठा केलेले राज्यात १८ जिल्हा परिषदा आहेत. त्यामध्ये बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, अहमदनगर, औरंगाबाद, भंडारा, बीड, चंद्रपूर,धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नांदेडचा समावेश आहे.