बुलडाणा जिल्ह्यात१४ टक्के नागरिकांचेच लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 10:47 AM2021-09-15T10:47:12+5:302021-09-15T10:47:18+5:30
Corona Vaccine : १८ वर्षांवरील २१ लाख ९९ हजार ८४६ व्यक्तींचे लसीकरण पूर्ण करण्याचे आव्हान आहे.
- नीलेश जाेशी
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण नियंत्रणात असले तरी तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज अन्न व अैाषध प्रशासनमंत्र्यांनी व्यक्त केलेली असतानाच जिल्ह्यातील १४ टक्के नागरिकांचे लसकीरण १४ सप्टेंबरपर्यंत पूर्ण झाले असल्याची माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली.
दरम्यान, असे असले तरी १८ ते ४४ वयोगटातील ४.३४ टक्केच व्यक्तींचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे हा टक्का वाढविण्याची सद्य:स्थितीत नितांत गरज आहे. या वयोगटातील ५४ हजार ५६८ व्यक्तींनीच आतापर्यंत लसीचे दोन डोस घेतले आहेत, तर ४५ वर्षांवरील २५ टक्के व्यक्तींनी लसीचे दोन्ही डोस पूर्ण केले आहेत. जिल्ह्याची लोकसंख्या २५ लाख ८० हजारांच्या घरात असून, त्यापैकी १८ वर्षांवरील २१ लाख ९९ हजार ८४६ व्यक्तींचे लसीकरण पूर्ण करण्याचे आव्हान आहे. गणेशोत्सवापाठोपाठ दसरा आणि नंतर दीपोत्सव आहे. त्यामुळे दीपोत्सवादरम्यान प्रसंगी तिसरी लाट येण्याची शक्यता आरोग्य क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर लसीकरणाचा वेग वाढवून येत्या दोन महिन्यांत जिल्ह्यातील लसीकरण पूर्णत्वास नेण्याची गरज खुद्द अन्न व अैाषध प्रसासनमंत्री तथा पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे मध्यंतरी साखरखेर्डा येथे बोलताना व्यक्त केली होती. लसीकरणाचा वेग वाढणे गरेजेचे आहे.