१९ गावातील रुग्णांना सेवा देणाऱ्या रुग्णवाहीकेलाच उपचाराची गरज - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:43 AM2021-04-30T04:43:32+5:302021-04-30T04:43:32+5:30
सध्याच्या गंभीर परिस्थीतीत ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सुदृढ करण्यासाठी नविन सुविधा युक्त रुग्णवाहीका उपलब्ध करुण देण्याची मागणी समोर येत ...
सध्याच्या गंभीर परिस्थीतीत ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सुदृढ करण्यासाठी नविन सुविधा युक्त रुग्णवाहीका उपलब्ध करुण देण्याची मागणी समोर येत आहे. सुलतानपूर प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका जुनी असल्याने त्यात वारंवार बिघाड होत आहे. प्रकृती चिंताजनक असलेल्या रुग्णांना दुसरीकडे हलविण्यासाठी रुग्णवाहिका शोधताना नातेवाईकांना बरीच कसरत करावी लागते. लोणार तालुक्यातील सुलतानपूर ही सर्वात मोठी ग्रामपंचायत असून हे गाव नागपूर औरंगाबाद राज्य महामार्गालगत व शेगाव पंढरपूर या पालखी महामार्गालगत असून, आजूबाजूला पंधरा ते वीस खेड्यांतील नागरिकांची वर्दळ या याठिकाणी असते. अधून-मधून किरकोळ व भीषण अपघात देखील या महामार्गावर घडत असतात. तर त्यातील काही रुग्णांचा उपचार प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अनेकवेळा केला जातो, परंतु त्या रुग्णाला पुढील उपचारासाठी मेहकर, बुलडाणा, जालना आदी ठिकाणी हलविण्यासाठी रुग्णवाहिका नादुरुस्त असल्यामुळे त्या रुग्णाला खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. या ठिकाणी इतरही अनेक रुग्ण उपचारासाठी भरती होतात. त्यांचा आजार जर बळावला तर त्यांना पुढील उपचारासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी रेफर करीत असताना रुग्णवाहिका ही त्या ठिकाणी रुग्ण घेऊन पोहोचेल किंवा नाही याची शाश्वती नसते. वैद्यकीय अधिकारी व रुग्णवाहिकेचा चालक या रुग्णवाहिकेला नाही. त्यामुळे रुग्णाला आर्थिक झळ सहन करावी लागत आहे.
नवीन रुग्णवाहिका देण्याची मागणी
प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांना दुसरीकडे हलविता यावे, यासाठी रुग्णवाहिकेची मागणी करण्यात आली आहे. रुग्णवाहिका जुनी असल्याने त्यात वारंवार बिघाड होत आहे. वारंवार रुग्णवाहिका नादुरुस्त असते. प्रकृती चिंताजनक असलेल्या रुग्णांना दुसरीकडे हलविण्यासाठी रुग्णवाहिका शोधताना नातेवाईकांना बरीच कसरत करावी लागते. नादुरुस्त रुग्णवाहिकांना त्वरित दुरुस्त कराव्या, किंवा तात्काळ नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
सध्याची रुग्णवाहीका ही अत्यंत जुनी आहे. तरीही शक्य होईल तोवर रुग्णांची प्रकृती बघुन आम्ही ह्या रुग्णवाहीकेचा वापर करतो. नवीन रुग्णवाहीचा प्रस्ताव पाठविला आहे.
डॉ. प्रल्हाद जायभाये, वैद्यकीय अधिकारी प्रा.आ. केंद्र सुलतानपूर.
जिल्ह्यात आरोग्य सेवेसाठी लवकरच नविन २८ रुग्णवाहीका येणार आहेत. त्यामध्ये सुलतानपूर प्रा. आ. केंद्रासाठी रुग्णवाहीका उपलब्ध करुण देण्यासाठी पुर्ण प्रयत्न करू.
रेणुका दिलीपराव वाघ जि. प. सदस्या. सुलतानपूर.