घोषणांचाच बाजार; फेरीवाल्यांच्या हाती अद्याप दमडीही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 09:55 AM2021-05-08T09:55:02+5:302021-05-08T09:55:17+5:30

Buldhana News : जिल्ह्यातील जवळपास ८,२६३ फेरीवाल्यांना अद्याप या मदतीची प्रतीक्षा आहे.

Only announcements; The peddlers still do not have a help | घोषणांचाच बाजार; फेरीवाल्यांच्या हाती अद्याप दमडीही नाही

घोषणांचाच बाजार; फेरीवाल्यांच्या हाती अद्याप दमडीही नाही

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : वाढत्या कोरोना संसर्गाला प्रतिबंध घालण्यासाठी लावण्यात आलेल्या निर्बंधानंतर हातावर पोट असलेल्या फेरीवाल्यांना दीड हजार रुपये आर्थिक मदत करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. मात्र, बुलडाणा जिल्ह्यातील जवळपास ८,२६३ फेरीवाल्यांना अद्याप या मदतीची प्रतीक्षा आहे. त्यांच्या हाती अद्याप दमडीही पडलेली नाही.
संचारबंदीमध्ये कौटुंबिक अर्थकारण प्रभावित होण्याची शक्यता पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या ५ हजार ४४६ कोटी रुपयांच्या पॅकेजअंतर्गत जिल्ह्यातील ८,२६३ फेरिवाल्यांना १ कोटी २३ लाख ९४ हजार ५०० रुपयांची मदत मिळणे अपेक्षित होते. मात्र, अग्रणी बँक, पालिका प्रशासन विभागाकडे यासंदर्भातील नेमकी माहितीच उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. पालिकास्तरावरच हा विषय हाताळल्या जात असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे नेमकी किती जणांना ही मदत मिळाली, हेही स्पष्ट होत नाही. परिणामी ‘नुसताच घोषणांचाच बाजार, फेरीवाल्यांच्या हाती दमडीही नाही’ अशी स्थिती आहे. गेल्यावर्षी मिशन बिगीन अंतर्गत जिल्ह्यातील ८,२६३ पैकी ५,७०० फेरीवाल्यांना ५७ कोटी रुपयांची मदत देण्यात आली होती. त्यामुळे बँकांकडे फेरीवाल्यांचा अद्ययावत डाटा उपलब्ध आहे. मात्र, फेरीवाले अद्यापही मदतीपासून वंचित असल्याचे चित्र आहे.

अशी आहे फिरवाल्यांची संख्या
बुलडाणा तालुक्यात १,१७८, चिखली १,१३८, देऊळगाव राजा २९९, सि. राजा १२७, मेहकर ३५६, लोणार २५६, संग्रामपूर ४०, शेगाव ८७४, खामगाव १०१५, नांदुरा ११८८, मलकापूर १२६८, जळगाव जामोद ४४३, मोताळा ८१ याप्रमाणे जिल्ह्यात फेरीवाल्यांची संख्या आहे. केंद्राच्या आत्मनिर्भर पॅकेजच्या वेळी या फेरीवाल्यांनी मदतीसाठी अर्ज केले होते. दरम्यान या ८ हजार २६३ फेरीवाल्यांपैकी ५ हजार ७०० जणांना आत्मनिर्भर पॅकेज अंतर्गत यापुर्वी ५७ कोटी रुपये कर्ज दिले आहे.


पायडल रिक्षाचालकांची माहिती पाठवली
राज्य शासनाने पॅकेज जाहीर केल्यानंतर बुलडाणा पालिकेने शहरात पायडल रिक्षा चालवीत असलेल्यांची माहिती संकलीत केली. त्यात अद्यापही शहरात सहा जण पायडल रिक्षा चालवत असल्याचे समोर आले. त्यांची माहिती पालिकेने नगर विकास विभागाकडे पाठविली असल्याचे सुत्रांनी सांगितले.


पालिका प्रशासनाकडेही उपलब्ध नाही माहिती
जिल्ह्यातील पालिकांवर नियंत्रण ठेवून असलेल्या पालिका प्रशासन विभागाकडे याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडेही अनुषंगिक माहिती उपलब्ध नसल्याचे पालिका प्रशासन अधिकारी मनोहर अकोटकर यांनी सांगितले. बुलडाणा पालिका मुख्याधिकारी महेश वाघमोडे हेही संपर्क कक्षेच्या बाहेर होते.

Web Title: Only announcements; The peddlers still do not have a help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.