जीवावर उदार होऊन मृतदेह हाताळणाऱ्यांना केवळ चारशे रुपये दाम !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:34 AM2021-05-26T04:34:39+5:302021-05-26T04:34:39+5:30
मागील वर्षीपासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. यानंतर मृतांची संख्या हळूहळू वाढू लागली. ही बाब आरोग्य यंत्रणेने गांभीर्याने घेण्यास ...
मागील वर्षीपासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. यानंतर मृतांची संख्या हळूहळू वाढू लागली. ही बाब आरोग्य यंत्रणेने गांभीर्याने घेण्यास सुरुवात केली. कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्या मृतदेहाला त्याचे नातेवाईकदेखील हात लावत नव्हते, इतकी वाईट स्थिती प्रकर्षाने समोर येत होती. अशा कठीण प्रसंगी मृतदेह उचलणार कोण, हा महत्त्वाचा प्रश्न होता. त्यासाठी वॉर्डबॉयची मदत घेणे निश्चित झाले. परिणामी, नवीन वॉर्डबॉयची भरती करण्यात आली. कोरोना रुग्णांच्या मृतदेहांची विल्हेवाट लावण्याचे काम सुरू झाले. यासाठी त्यांना केवळ ४०० रुपये मिळत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कंत्राटी पद्धतीने भरलेली पदे - ६३७
दिवसाला रोजगार - ४०० रुपये
कंत्राट - तीन महिन्यांचे
काय असते काम?
कोरोना वॉर्डात काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना साफसफाईच्या कामासोबत मृतदेहाचे पॅकिंग करणे, मृत रुग्णांच्या नातेवाईकांना माहिती देणे, मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवणे आदी कामे करावी लागत आहेत. तसेच एखाद्या वेळेस बाहेरून औषधेही आणून द्यावी लागत आहेत.
पोट भरेल एवढे पैसे द्या, नोकरीत कायम करा...
कोरोना काळात जीवावर उदार होऊन मृत्यूच्या दाढेत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामाच्या तुलनेत दाम मात्र खूपच कमी मिळत आहे. त्यामुळे किमान पोट भरेल एवढे तरी पैसे द्यावेत, अशी मागणी आहे.
कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरीवर घ्यावे; तसेच त्यांचा विमा काढावा आदी मागण्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आहेत.
मृतदेहांचे पॅकिंग आणि शिफ्टिंग; तरी कामाचे मोल नाही!
कोरोनाबाधित व्यक्तीपाशी एक तर कोणी जात नाही. त्यात त्यांचा मृत्यू झाल्यानंतर अधिकच भर पडते. त्या मृतदेहाच्या विल्हेवाटीची जबाबदारी पार पाडूनही पुरेसे मानधन मिळत नाही. याचे दुःख आहे. शिवाय निवास, भोजनाची सोय नाही.
दयानंद गवई, वॉर्डबॉय.
वॉर्डबॉयला कोविड सेंटरमध्ये ६ तास ड्युटी करावी लागत आहे. कोरोना रुग्ण शिफ्ट करणे, मृतदेह पॅकिंग करणे आदी कामे करावी लागतात. मात्र, त्या तुलनेत मानधन मिळत नाही. दिवसाकाठी केवळ ४०० रुपये मिळतात.
गणेश बरकले, वॉर्डबॉय.
कोरोनाचा काळ सुरू असून, आमच्या आरोग्याची कोणीही काळजी घेताना दिसत नाही. शिवाय आमच्या कामाचा ताण अधिकच वाढवून ठेवलेला आहे. पॅकिंग आणि शिफ्टिंगचे काम आम्ही करीत असूनदेखील आमच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
वॉर्डबॉय.
इतकी मोठी जबाबदारी सांभाळूनदेखील कामाचे कोणीही योग्य मूल्यांकन करीत नाही. समान काम, समान वेतन असावे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचाही मोठा प्रश्न आहे. आरोग्य विभागात कायमस्वरूपी नोकरी मिळावी.
अमोल गवई, जिल्हाध्यक्ष, कोविड कंत्राटी कर्मचारी, बुलडाणा.