झाडे जगली तरच मिळणार कंत्राटदाराला रक्कम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2017 01:08 AM2017-07-08T01:08:35+5:302017-07-08T01:08:35+5:30
खामगाव पालिकेचा ऐतिहासिक निर्णय
अनिल गवई ।
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: लावलेली किमान ८० टक्के झाडे जगली तरच कंत्राटदाराला देयक देण्याचा ऐतिहासिक ठराव खामगाव नगरपालिकेने घेतला आहे. वृक्षारोपणासोबतच झाडे जगविण्याची काळजी घेण्यासाठी असा ठराव घेणारी ही पालिका राज्यात पहिलीच असावी.
खामगाव नगरपालिकेची विशेष सभा ५ जुलै रोजी पार पडली. यावेळी विविध विषयांवरील ठराव बहुमताने पारित करण्यात आले. यामध्ये वृक्षारोपणाबाबतही ऐतिहासिक ठराव घेण्यात आला. या ठरावानुसार शहरात शासनाच्या ‘एकच लक्ष्य चार कोटी वृक्ष’ या ध्येयानुसार वृक्षारोपण मोहीम राबविण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच वृक्षारोपण केल्यानंतर लावलेली झाडे जगविण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा अनुभव असून, यात शासनाचा पैसा पाण्यात जात आहे. त्यामुळे लावलेली झाडे जगली तरच संबंधित कंत्राटदाराला तीन वर्षानंतर देयक अदा करण्याची अट घालावी असे ठरले.
तसा ठरावही बहुमताने पारित करण्यात आला. पालिकेचा हा ठराव वृक्षलागवडीसोबतच झाडे जगविण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार असून, शहर हिरवे बनविण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल या माध्यमातून उचललेले गेलेले आहे. तर असा ठराव घेणारी खामगाव पालिका ही राज्यातील पहिली नगरपालिका असावी, असे म्हटले जात आहे. दरम्यान, या ठरावाला तांत्रिक मान्यता देण्यात आली असून, येत्या काही दिवसांमध्ये उद्दिष्टानुसार वृक्ष लागवड केली जाणार आहे.
६ ते ७ फुटांच्या रोपांची होणार लागवड!
नगरपालिकेच्या वृक्षारोपण मोहिमेंतर्गत ६ ते ७ फूट वाढलेल्या रोपांची लागवड केली जाणार आहे. त्यामुळे ही रोपे जगण्याची शक्यता जास्तचे राहील; परंतु नियमित पाणी देणे व नीगा राखण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदारास पार पाडावी लागेल. तीन वर्षापर्यंत संरक्षक कठडे बसवून व्यवस्थित झाडे जगविली तरच कंत्राटदाराला त्याच्या कामाचा मोबदला मिळेल. त्यामुळे झाडे जगविण्याकडे कंत्राटदार विशेष लक्ष पुरविणार यात शंकाच नाही.
प्रत्येक नगरसेवकास १०० झाडांचे लक्ष्य
सदर वृक्षारोपण मोहिमेंर्तगत प्रत्येक नगरसेवकास वैयक्तिकरित्या १०० झाडे लावून जगविण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्येक नगरसेवकाने आपले उद्दिष्ट पूर्ण केल्यास ३५ नगरसेवकांच्या माध्यमातून ३५०० झाडे लागू शकतात. १०० झाडे लावण्याची व जगविण्याची ही जबाबदारी कोण-कोण पूर्ण करणार याकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागणार आहे.