ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी उरले फक्त सहा दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:53 AM2021-01-08T05:53:21+5:302021-01-08T05:53:21+5:30
१३ जानेवारी रोजी ग्रामपंचायत निवडणुकीसाठीच्या प्रचाराच्या तोफा थंडावणार आहे. त्यामुळे उपलब्ध वेळेचा निवडणूक रिंगणातील उमेदवार पुरेपूर वापर करून प्रचारावर ...
१३ जानेवारी रोजी ग्रामपंचायत निवडणुकीसाठीच्या प्रचाराच्या तोफा थंडावणार आहे. त्यामुळे उपलब्ध वेळेचा निवडणूक रिंगणातील उमेदवार पुरेपूर वापर करून प्रचारावर भर देत आहे. दुसरीकडे बुलडाणा जिल्ह्यात ४,७५१ उमेदवार निवडून द्यावयाचे असून, यापैकी १८ टक्के उमेदवार हे अविरोध आले आहेत. परिणामी प्रत्यक्षात आता ३,९०४ जागांसाठी नऊ हजार २७६ उमेदवार निवडणूक रिंगणात भाग्य आजमावत आहे. दहा लाख ३४ हजार ३३ मतदार या निवडणुकीत मतदान करणार आहेत. निवडणूक रिंगणातील उमेदवारांपैकी २,३७६ महिला उमेदवार आहेत, तर या निवडणुकीत ४ लाख ९० हजार ५२२ महिला मतदार मतदान करणार आहेत.
दुसरीकडे १५ जानेवारी रोजी मतदान होत असून, प्रचार संपण्यास सहा दिवस बाकी असल्याने प्रशासकीय पातळीवर मतदान प्रक्रियेची पूर्वतयारी निवडणूक विभाग करत असून, यासंदर्भात नियुक्त कर्मचाऱ्यांचेही प्रशिक्षणही तहसीलस्तरावर घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
तालुकानिहाय उमेदवारांची संख्या
बुलडाणा तालुक्यात सध्या ११०४, चिखली तालुक्यात ९७५, देऊळगाव राजामध्ये ३६०, सिंदखेड राजामध्ये ६०३, मेहकरमध्ये ७४९, लोणारमध्ये २८३, खामगावध्ये १२९५, शेगावमध्ये ४५८, जळगाव जामोद ५३७, संग्रामपूर ५३७, मलकापूर ५८२, नांदुरा ७७३ आणि मोताळा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात ९६३ याप्रमाणे ९२७६ उमेदवार रिंगणात आहेत. यापैकी मतदार आता कोणाच्या पारड्यात मते टाकतो याकडे सध्या ग्रामीण भागाचे लक्ष लागून राहिलेले आहे.
जिल्ह्यात ८७५ जणांची अविरोध निवड
ग्रामपंचायत निवडणुकीत ४,७५१ पैकी ८७५ जणांची अविरोध निवड झाली आहे. यामध्ये बुलडाणा तालुक्यातील ६७, चिखली तालुक्यातील १४३, देऊळगाव राजा तालुक्यातील ६२, सिंदखेड राजा तालुक्यातील ८५, मेहकर ५३, लोणार १८, खामगाव ११४, शेगाव ४१, जळगाव जामोद ५७, संग्रामपूर ३७, मलकापूर ४२, नांदुरा ८१ आणि मोताळा तालुक्यातील ७५ जणांचा यामध्ये समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले.
महिलांसाठी आरक्षित जागा किती?
या निवडणुकीत ४,७५१ उमेदवार निवडून द्यावयाचे असून, यापैकी ८७५ उमेदवार आधीच अविरोध झालेले आहेत. दरम्यान, ५० टक्के महिला आरक्षणाच्या हिशोबाने विचार करता ४,७५१ सदस्यांपैकी २,३७६ जागांवर महिला उमेदवार निवडून द्यावयाचे आहे. त्यामुळे या निवडणुकीत महिला आधिराज्य गाजवण्याची शक्यता अधिक आहे. सध्या निवडणूक रिंगणामध्ये १०,१५१ उमेदवार आपले राजकीय भाग्य आजमावत असल्याचे चित्र आहे.