Video : ... 'तरच मी विधानसभा निवडणूक लढवणार, संपूर्ण महाराष्ट्र माझी कर्मभूमी'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 08:57 PM2019-08-29T20:57:00+5:302019-08-29T20:57:50+5:30
बुलडाणा येथे युवा सेनेची जनआशिर्वाद यात्रा 29 ऑगस्ट रोजी आली असता स्थानिक विश्रामगृहामध्ये ‘लोकमत’शी बोलताना आदित्य ठाकरे यांनी हे वक्तव्य केले.
बुलडाणा - 14 व्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने युतीमध्ये शाब्दीक फेकाफेक सुरू आहे. त्या पृष्ठभूमीवर भाजप-शिवसेना एकमेकांचा विश्वासघात करणार नाही, अशी भूमिका युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी बुलडाणा येथे व्यक्त केली. दरम्यान, युती संदर्भात दोन्ही पक्षांच्या प्रमुखांनी जनतेसमोर भूमिका स्पष्ट केली आहे. सर्व काही जनतेसमोर झालेले आहे, असेही ते म्हणाले.
बुलडाणा येथे युवा सेनेची जनआशिर्वाद यात्रा 29 ऑगस्ट रोजी आली असता स्थानिक विश्रामगृहामध्ये ‘लोकमत’शी बोलताना आदित्य ठाकरे यांनी हे वक्तव्य केले. दरम्यान, विधानसभानिवडणूक लढविण्यासंदर्भात आपण अद्याप काही फिक्स केलेले नाही. निवडणूक लढावी की नाही, हे जनताच ठरवेल, जनताच मला आदेश देईल, असे म्हणत निवडणूक लढविण्याचे संकेत आदित्य यांनी दिले आहेत.
जनताच मला सांगेल, त्यानंतरच मी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेईन, असे आदित्य म्हणाले. मतदारसंघ म्हणजे आपली कर्मभूमी असते, संपूर्ण महाराष्ट्र ही माझी कर्मभूमी आहे. मी अजून कुठेही फिक्स केलेलं नाही. पण, मी लढवायची की नाही हे जनताच आदेश देईल मला, अशा शब्दात निवडणूक लढविण्यास आपण जनतेला विचारुनच निर्णय घेणार असल्याचे ठाकरेंनी म्हटलंय. शिवसेनेमुळे 10 लाख शेतकऱ्यांना पीकविमा मिळालाय. आता, सरसकट कर्जमाफी हेच आमचं उद्दिष्ट असल्याचंही आदित्य यांनी म्हटलं.
दरम्यान, आदित्य यांच्यासाठी मुंबईतील सुरक्षित मतदारसंघाची चाचपणी केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई शहर अध्यक्षांना शिवबंधन बांधण्यात आल्याने त्यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघात युवा सेना प्रमुखांना शिवसेनेचे उमेदवार म्हणून उतरविण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती आहे. आदित्य ठाकरे यांच्यासाठी विधानसभा मतदारसंघाची शोधाशोध सुरू असतानाच बुधवारी दिग्रसचे शिवसेनेचे आमदार, महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनीच थेट आदित्य यांच्यासाठी आपला सुरक्षित दिग्रस विधानसभा मतदारसंघ सोडण्याची जाहीर तयारी दर्शविली.