४० टक्के कायमस्वरूपी दिव्यांग असणाऱ्यांनाच टीईटीमध्ये लेखनिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:13 AM2021-09-02T05:13:36+5:302021-09-02T05:13:36+5:30
बुलडाणा : शिक्षक पात्रता परीक्षा १० ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे. यामध्ये अनेक दिव्यांग उमेदवार लेखनिकाची मदत घेण्यासाठी उत्सुक ...
बुलडाणा : शिक्षक पात्रता परीक्षा १० ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे. यामध्ये अनेक दिव्यांग उमेदवार लेखनिकाची मदत घेण्यासाठी उत्सुक असतात. परंतु परीक्षेत लेखनिकचा आधार घेण्यासाठी अनेक मर्यादा असल्याने दिव्यांग उमेदवारांमध्ये याबाबत संभ्रम आहे. लेखनिकाची मदत घेण्यासाठी परीक्षा देणारा उमेदवार हा ४० टक्के कायमस्वरूपी दिव्यांग असणे बंधनकारक आहे.
डी.एड., बीएड. झालेल्यांना शिक्षक पात्रता परीक्षा बंधनकारक आहे. सध्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून, ५ सप्टेंबरपर्यंत अर्ज भरण्याला मुदतवाढ देण्यात आलेली आहे. परीक्षेदरम्यान दिव्यांग उमेदवारांना लेखनिकाची मदत घ्यावयाची असल्यास अर्ज भरताना तशी माहिती उमेदवारांना भरावी लागते. परंतु दिव्यांगांचे प्रमाणपत्र असले म्हणजे त्या उमेदवाराला परीक्षेमध्ये लेखनिकाची मदत घेता येईल, असे नाही. त्यासाठी परीक्षा मंडळाने विविध मार्गदर्शक सूचना लागू केलेल्या आहेत. परंतु त्याबाबत उमेदवारांना माहिती नसल्याने परीक्षेचा अर्ज भरताना दिव्यांग उमेदवारांचा गोंधळ उडतो. लेखनिकाची मदत घेण्यासाठी संबंधित उमेदवार हा ४० टक्के कायमस्वरूपी विकलांगत्व असलेलाच पात्र ठरणार आहे.
लेखनिकाची मदत घेण्यासाठी अशा आहेत सुचना...
१) दृष्टिहिन, अल्पदृष्टी, अस्थिव्यंग, सेरेब्रल पाल्सी आणि डिस्लेक्सियाने बाधित व किमान ४० टक्के कायमस्वरूपी विकलांगत्सव असलेले उमेदवार पात्र आहेत.
२) उमेदवार लिहिण्यासाठी सक्षम नसल्यास परीक्षा प्रयोजनार्थ गुणवत्तेनुसार लेखनिकाची मदत घेता येते.
३) पात्र दिव्यांग उमेदवारांना लेखनिकाची मदत घेण्यासाठी संबंधित जिल्ह्याचे प्राथमिक किंवा माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे अर्ज करून पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे.
४) उमेदवारांना स्वत: लेखनिकाची व्यवस्था करावी लागते. त्याचे मानधनही उमेदवाराकडे आहे.
५) लेखनिकाने स्वत: प्रश्नपत्रिका सोडवू नये, अथवा उमेदवारास कोणत्याही प्रकारे मार्गदर्शन करण्यास बंदी आहे.
परीक्षेत अतिरिक्त वेळ कोणाला?
दृष्टीिहीन, अल्पदृष्टी, अस्थिव्यंग, सेरेब्रल पाल्सी आणि डिस्लेक्सियाने बाधित उमेदवारांनाच अनुग्रह कालावधी लागू आहे. यामध्ये पात्र उमेदवाराला परीक्षेत प्रत्येक तासाला २० मिनिटे याप्रमाणे अतिरिक्त वेळ देण्यात येणार आहे. सक्षम प्राधिकाऱ्याने प्रदान केलेले वैद्यकीय प्रमाणपत्र परीक्षेच्यावेळी सादर करणाऱ्या उमेदवारांनाच अतिरिक्त वेळेसाठी परवानगी देण्यात येते.
टीईटीसाठी परीक्षा मंडळाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना व अटीमध्ये बसणारा उमेदवारच लेखनिकाची मदत घेऊ शकतो. किमान ४० टक्के कायमस्वरूपी विकलांगत्व असलेल्या पात्र उमेदवारांने परीक्षा मंडळाच्या इतरही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
सचिन जगताप, शिक्षणाधिकारी, बुलडाणा.